लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : आपल्या मुला-मुलीचे लग्न थाटामाटात करण्याची प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यानुसार प्रत्येकच आई-वडील आपापल्यापरिने लग्न सोहळ्यात आपल्या बडेजावपणाचे प्रदर्शन करून समाजात आपली ऐपत दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे लग्न सोहळ्यातील उपस्थिती व वेळेवर निर्बंध लादण्यात आल्याने लग्न समारंभातील बडेजावपणाला ‘ब्रेक’ लागला आहे. यानिमित्त कोरोनाने गरीब-श्रीमंतांना एकाच पंक्तीत आणून बसविल्याचे चित्र आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी कोरोनाला वाकुल्या दाखवत अगदी थाटात आपले लग्न उरकून घेतले. मात्र, सध्या राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची उपस्थिती आणि २ तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर-वधूंनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. मात्र, बहुतांश वर-वधू ‘आलीया भोगाशी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे आपले मन मोडून लग्न उरकून घेत आहेत. लग्न सोहळ्यात बहुतांश आई-वडिलांकडून बडेजावपणाचे प्रदर्शन घडवून आपल्या मुला-मुलींचे लग्न अविस्मरणीय बनविण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी समाजात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्न सोहळ्यात पैशांची उधळपट्टी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते.
मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ‘ब्रेक’ लागला असून, गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या मुला-मुलींचे लग्न अगदी साधेपणाने पार पडत आहे. अगदी कमी खर्चात लग्नसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे तर श्रीमंतांनी लग्नात आनंद लुटायला न मिळाल्याने निराशा व्यक्त केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, कोरोनामुळे किमान लग्न सोहळ्यातील गरीब-श्रीमंतांमधील दरी नाहिशी झाली असून, कोरोनाने सध्या सर्वांना एकाच पंक्तीत आणून बसवले आहे.
बॉक्स
कमी खर्चात लग्न, कोरोनाची शिकवण?
लग्न सोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्यांची चळवळ जोमाने राबविण्यात येत होती. मात्र, कोरोनाने या सर्वांना फाटा देऊन वैयक्तिक लग्न सोहळाही कमी खर्चात पार पाडता येतो, अशी बळजबरीने कां होईना पण शिकवण दिली आहे.
याशिवाय लग्न समारंभावरील निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, बँड पथक, कॅटरर्स, डेकोरेशन, सुगम संगीत पथक यासह अनेक व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.