जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी सहकार्य करा
By Admin | Updated: October 18, 2015 00:21 IST2015-10-18T00:20:12+5:302015-10-18T00:21:27+5:30
सन २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून कार्य करायाचे आहे.

जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी सहकार्य करा
सहभाग वाढविण्यासाठी सभा : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
भंडारा : सन २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून कार्य करायाचे आहे. याकरिता जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी यांचा सहभाग वाढविण्याकरिता घेण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती विनायक बुरडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती नरेश डहारे, समाज कल्याण समिती सभापती निळकंठ टेकाम, बालकल्याण समिती सभापती शुभांगी रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रामदास धांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सेलोकर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) मैदमवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी शेंडे व विभाग प्रमुख आदींची मंचकावर उपस्थित होती. मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचंड महत्वकांक्षेनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची आॅक्टोबर २०१४ पासून सुरुवात केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० व्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्हा परिषद भंडारा यामध्ये देखील मागील वर्षापासून कार्यक्रम सुरु झालेला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.
यावेळी त्यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश, महत्व तसेच त्या संदर्भातील भंडारा जिल्ह्याची सद्यस्थिती व सन २०१९ जिल्हा हागणदारीमुक्त करणे संदर्भात करावयाची उपाययोजना या संदर्भात सर्व उपस्थित पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, विभाग प्रमुख, गविअ व अन्य अधिकारी यांचे समोर सादरीकरण करून सर्वांना या मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याबाबत आवाहन केले. (नगर प्रतिनिधी)