खतांचा काळाबाजार, तुटवड्यांवर नियंत्रण ठेवा
By Admin | Updated: June 15, 2014 23:22 IST2014-06-15T23:22:11+5:302014-06-15T23:22:11+5:30
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणांची मागणी वाढली आहे. मागीलवर्षी दुष्काळाची झळ पोहचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खताचा पुरवठा करा,

खतांचा काळाबाजार, तुटवड्यांवर नियंत्रण ठेवा
भंडारा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणांची मागणी वाढली आहे. मागीलवर्षी दुष्काळाची झळ पोहचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खताचा पुरवठा करा, याशिवाय तुटवडा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे व रासायनिक खतांचा खा.पटोले यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कृषी आयुक्तालयकडून मिळालेल्या बियाणे व खतांच्या पुरवठ्यासंबंधी माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. खत व बियाण्यांचा साठा पुरेसा प्रमाणात आहे. पाऊस येताच बियाण्यांची मागणी वाढेल तर आॅगस्ट महिन्यानंतर शेतकऱ्यांकडून खताची मागणी होईल. यावर्षी साठा असल्याने खत व बियाणांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय खताचा बफर साठाही राहणार असल्याचे सांगून बोेगस बियाण्यांचा पुरवठा झाला नसल्याचे सांगितले. खताची रॅक लावण्यासंदर्भात विचारले असता विक्रेत्यांच्या दृष्टीने गोंदिया येथेच खत उतरविणे योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोंदिया येथून जिल्ह्याच्या वाट्याचे खत पळविले जात असल्याच्या मुद्यावर खा.पटोले यांनी लक्ष वेधले असता, यावर्षी असा प्रकार होणार नसल्याचे सांगून गोंदिया येथे रॅक लावण्याची विक्रेत्यांची मागणी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर त्यांनी संसर्गजन्य आजाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांच्याकडून जाणून घेतली. आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जेजूरकर, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)