परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल
By Admin | Updated: February 14, 2016 00:44 IST2016-02-14T00:44:50+5:302016-02-14T00:44:50+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त भुयार येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामवासीयांनी अभिनव असा ठराव संमत केला.

परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल
दोन गटात वाद : प्रकरण भुयार गावातील दारूबंदीचे
पवनी : प्रजासत्ताक दिनानिमित्त भुयार येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामवासीयांनी अभिनव असा ठराव संमत केला. अख्या महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी असे समाजसेवक ओरडून सांगत असताना भुयार येथील ग्रामसभेने 'देशी दारू दुकान' सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव संमत केला. तेव्हापासून गावात दोन गट पडलेले आहेत. अवैध दारू दुकाने बंद व्हावीत अशा विचाराचा एक तर अधिकृत दुकानास नाहरकत देवू नये अशा विचाराचा दुसरा गट गावात निर्माण झाला असल्याने भुयान गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी परस्पराविरूद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू असताना गावातील ३५ ते ४० महिला सभेत पोहचल्या व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्राम विकास अधिकारी यांनी संगणमत करून ग्रामपंचायत भुयारच्या हद्दीत देशी दारूचे दुकान सुरू करण्यास नाहरकत प्रमाणपत्र दिले ते रद्द करावे, अशी मागणी करू लागले.
प्रकरण तणावपूर्ण झाले व त्या फिर्यादी उषा विजय मेश्राम रा. भुयार यांनी आरोपी संजय विष्णू भटकर (४५) रा. तकिया वॉर्ड भंडारा, ग्राम विकास अधिकारी भुयार तसेच सरपंच दुर्गा विजय भोयर (४०) यांनी फिर्यादी व इतर महिलांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून जातीवाचक शिवीगाळ करीत हात व बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तोंडी व लेखी तक्रार दाखल केली. त्यावरून भादंवि २९४, ५०६, ५०४, ३२३ सहकलम ३४ कलमान्वये आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रभार असलेले पोलीस निरीक्षक मधुकर गिते करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शासकीय कामात अडथळा केल्यावरून गुन्हा
येथे ग्रामपंचायत मासिक सभा सुरू असताना उषा विजय मेश्राम (४०), मंजूषा दिलीप भोयर (१८), कविता विलास बाळबुधे (२८), शालु भाऊराव नंदुरकर (३६), शालु राजकुमार थोमले (२३) यांनी गौर कायद्याने मंडळी जमवून सभास्थळी प्रवेश केला. महिला सरपंच दुर्गा विजय भोयर (४०) यांना मारहाण केली व टेबलवरील रेकार्डची फेकफाक करून कागदपत्रांची ओढताण केली, अशी लेखी तक्रार भुयार ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी संजय विष्णू भटकर (४५) रा. तकिया वॉर्ड भंडारा यांनी पोलीस स्टेशनला केली त्यानुसार कलम १३४, ३४३, ३२३, १८२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ चे रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू आहे.