दूषित पाणीमुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:25+5:302014-05-11T00:04:25+5:30
वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडारा तालुक्यातील साहुली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा करणारी विहिर गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहे़

दूषित पाणीमुळे आरोग्य धोक्यात
भंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडारा तालुक्यातील साहुली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा करणारी विहिर गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहे़ येथे नव्याने पाणीपुरवठा करणे गरजेचे असतानाही गोसेखुर्द विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही़ परिणामी साहुलीवासियांना दुर्गधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे़ शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. साहुली येथे सन १९९८-९९ मध्ये पाणीपुरवठा योेजना सुरु करण्यात आली़ परंतु जिल्हाधिकार्यांनी दि़ ८ आॅगस्ट २००७ रोजी पत्र पाठवून सदर योजना ही गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्याचे ग्रामपंचायतीला कळविले़ त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी त्या बुडीत क्षेत्राची पाहणी केली़ दोन माहिने लोटून गेले़ मात्र गोसेखुर्द विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही़ जिल्हा परीषदने गावात विहीर, जलकुंभ व जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा तयार करून मंजुरीसाठी गोसेखुर्द विभागाकडे पाठविला आहे़ मात्र याकडेही त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे़ त्यामुळे शासन प्रशासन साहुलीवासीयांच्या जीवनाशी खेळ खेळत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी केला आहे़ भंडारा जिल्ह्यातील पवनी ताालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे़ त्यामध्ये पाणी साठवणे सुरू झाले आहे़ नागपुरातून वाहत येणार्या नाग व कन्हान नदीचे घाण पाणी साहुली येथील विहिरीत मिसळते़ या ठिकाणी दोन्ही नद्याचा संगम होतो़ गोसे धरणातील जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी काठावरील गावाचे गुरेढोरे नदीतीलच पाणी पितात. दूषित पाण्यामुळे शेतकर्यांचे जनावरांना रोगराई होण्याची संभावना निर्माण झाली आहे. साहुली परिसरात कावीळ आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देऊन साहुली येथे नव्याने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. (नगर प्रतिनिधी)