मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा
By Admin | Updated: August 7, 2014 23:46 IST2014-08-07T23:46:58+5:302014-08-07T23:46:58+5:30
मोहाडीत सध्या नळाद्वारे चिखल मिश्रीत गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार, गॅस्ट्रो, काविळ, ताप यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले

मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा
मोहाडी : मोहाडीत सध्या नळाद्वारे चिखल मिश्रीत गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार, गॅस्ट्रो, काविळ, ताप यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले असून डॉक्टरांकडे रांगाच रांगा पहायला मिळत आहेत.
मोहाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मोहगाव व खोडगाव येथील सूर नदी वरुन होतो. पावसाळ्यात नदीला पूर येताच नेहमी मोहाडीला गढूळ पााण्याचा पुरवठा होतो. तसेच गावात मुबलक पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून येथील नागरिकांना चार ते पाच फुट पर्यंतचे खड्डे खोदून नळाचे पाणी घेत आहेत. पावसाळ्यात या खड्यात पावसाचे पाणी साचते व तेच गढूळ पाणी जलवाहिनीमध्ये जाते. त्यामुळे सुद्धा नळांना गढूळ पाणी येते. गढूळ पाण्यात अनेक प्रकारचे विषाणू व जंतू असतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हेच विषाक्त पाणी प्याल्याने नागरिक आजारी पडत आहेत.सर्व मोठ्या गावात जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. मात्र मोहाडीत अजूनपर्यंत जलशुद्धीकरण केंद्र बनविण्यात आले नाही. सात आठ वर्षापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. जलशुद्धीकरण केंद्रसाठी जलवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र कुठेतरीमाशी शिंकली आणि पुढील बांधकाम बंद करण्यात आले. ते अजूनपर्यंत सुरु करण्यात आले नाही. त्यावेळी खर्च करण्यात आलेला अंदाजे ५ ते १० लष रुपयांचा खर्च पाण्यात गेला. त्यानंतर हे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायतीने प्रयत्न केले नाही. प्रशासनही येथील हजारो जनतेच्या आरोग्याशी खेळत असून येथे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे पावले उचलताना दिसत नाही. येथील नागरिक पिण्याच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करतात. पाण्यात तुरटी फिरविल्यानंतर काही वेळाने ड्रम अथवा गुंडाच्या बुडाशी गाळाचा थर बसलेला दिसतो व पाणी स्वच्छ दिसते. मात्र याने विषाणू मरत नाही. यासाठी पाणी उकळून पिणेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. परंतु संबंधित विभाग जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. (शहर प्रतिनिधी)