शौचालय निर्मितीसाठी ‘ते’ बनले बांधकाम मजूर
By Admin | Updated: February 27, 2017 00:28 IST2017-02-27T00:28:33+5:302017-02-27T00:28:33+5:30
एखाद्या बांधकामाच्या कामावर जर कोणी चांगले कपडे परिधान केलेला मजूर दिसला तर सर्वांना आश्चर्य वाटेल. ...

शौचालय निर्मितीसाठी ‘ते’ बनले बांधकाम मजूर
ध्यास उद्दिष्ट्यपूर्तीचा : स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूचे श्रमदान
प्रशांत देसाई भंडारा
एखाद्या बांधकामाच्या कामावर जर कोणी चांगले कपडे परिधान केलेला मजूर दिसला तर सर्वांना आश्चर्य वाटेल. होय, उंची वस्त्र परिधान केलेल्या स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचाऱ्यांनी स्वत: बांधकाम मजूरीचे काम करून एका गरीब व्यक्तीचे अडलेले शौचालयाचे काम पूर्ण करण्यास मदत केली. सर्वांसाठी आश्चर्यकारक बाब असली तरी ती सत्य आहे. स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूच्या पुढाकारामुळे एका गरीबाचे शौचालय पूर्ण झाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथील देवराव पंधरे यांच्या शौचालयाचे अर्धवट बांधकाम पूर्णत्वास नेण्यात स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूने मदत केली. या चमूने केलेल्या श्रमदानातून पंधरे यांचे पूर्ण झाले असून गावाच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झालेले आहे. शनिवारला जिल्हा व तालुका स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूने शौचालय बांधकामाची पाहणी करण्याकरिता आसलपाणी गावात भेट दिली. यावेळी पंधरे यांच्या शौचालयाचे बांधकाम अपूर्णावस्थेत आढळून आले. याबाबत चमूने त्यांना विचारणा केली असता, बांधकाम करूनही शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नसल्याची माहिती दिली. चमूने त्यांच्या घरी बांधण्यात आलेल्या शौचालयाची पाहणी केली असता बांधकाम अर्धवट आढळले. त्यामुळेच अनुदान मिळाले नसल्याची बाब समोर आली. यात शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या गवंड्याने काम अर्धवट ठेवून दुसऱ्या कामावर पळ काढल्याने हे बांधकाम पूर्ण झाले नाही.
त्यामुळे चमूने पुढाकार घेत पंधरे यांना विश्वासात घेवून शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरच अनुदान प्राप्त होणार असल्याचे सांगितले. मात्र, गवंडी मिळत नसल्याने पंधरे यांनी हतबलता दाखविली. यावर जिल्हा माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, समूह समन्वयक शशिकांत घोडीचोर, जलसुरक्षक रमेश गौपाले, वाहनचालक टिंकू क्षिरसागर, महेश गावंडे यांनी पुढाकार घेऊन पंधरे यांचे अर्धवट शौचालय बांधकाम पूर्ण करण्यासाठी मजूर बनून काम पूर्ण करून देण्याचा विश्वास दाखविला. या सर्वांनी पंधरे यांच्या उर्वरित बांधकामासाठी सिंमेंट काँक्रीट तयार केले. यानंतर गवंडी यांच्या मदतीने या सुटबुटधारक स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूने श्रमदान करीत शौचालयाचे अपूर्णा अवस्थेतील बांधकाम पूर्ण केले. या चमूच्या श्रमदानामुळे देवराम पंधरेच्या प्रोत्साहनपण अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुटबुटमध्ये मजूर
स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूवर हागणदारीमुक्त गाव करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याकरिता ते दिवसरात्र एक करीत आहेत. याच अनुषंगाने आसलपाणी येथे अर्धवट शौचालय बांधकाम दिसल्याने त्यांच्या पदाची किंवा मजुरीचे काम केल्याने कमीपणा येईल याची काळजी न करता त्यांनी हातात फावडे, घमेले घेवून श्रमदान केले. सुटबुटातील मजूर बघून ग्रामस्थांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मात्र या पथकाने पुढाकार घेतला नसता तर पंधरे यांचे बांधकाम पूर्ण झाले नसते. चमूच्या श्रमदानाने पंधरे यांच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसू लागला.