अस्तित्वात नसलेल्या क्षेत्रात वनतलावाचे बांधकाम
By Admin | Updated: February 20, 2016 01:06 IST2016-02-20T01:06:02+5:302016-02-20T01:06:02+5:30
मोहाडी तालुक्यातील शिवनी येथे चार वनतलाव बांधण्यात आले. मात्र, या वनतलाव बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे एकपाठोपाठ एक प्रकरण दररोज उघडकीस येत आहे.

अस्तित्वात नसलेल्या क्षेत्रात वनतलावाचे बांधकाम
प्रकरण शिवनी वनतलावाचे : अंदाजपत्रकात एकच कंपार्टमेंट नंबर, सातबारा व नकाशा वगळता कागदपत्र बनावट
प्रशांत देसाई भंडारा
मोहाडी तालुक्यातील शिवनी येथे चार वनतलाव बांधण्यात आले. मात्र, या वनतलाव बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे एकपाठोपाठ एक प्रकरण दररोज उघडकीस येत आहे. यात आता चारही वनतलाव बांधण्यासाठी दाखविण्यात आलेले कंमार्टमेंट नंबरच अस्तित्वात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
वनपरिक्षेत्र जाम (कांद्री) सहवनक्षेत्र आंधळगांव अंतर्गत शिवनीच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून चार वनतलाव बांधण्यात आले. या वनतलावांच्या बांधकामाच्या परवानगीसाठी वापरण्यात आलेले कागदपत्र पूर्णपणे बनावट असल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी मागितलेल्या माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी हे वनतलाव बांधण्यात आले. मात्र, यासाठी वनविभगाच्या अधिकाऱ्यांनीच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. यासाठी त्यांनी हिवरा येथील वनतालाचे कागदपत्र जोडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरले. यात आता पुन्हा नविन बाब समोर आली असून ती वन कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यात वनविभागाने कंमार्टमेंट नंबर नसताना वनतलावाच्या अंदाजपत्रकावर मात्र त्याचा चुकीचा नंबर टाकण्यात आलेला आहे. वनविभागाचे काम अजूनपर्यंत गट नंबरवर सुरू आहे.
कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची गंभीर बाब तत्कालीन उपवनसंरक्षक विनय ठाकरे व वनपरिक्षेत्राधिकारी लोंढे यांच्या निदर्शनात येताच यांनी काम बंद केले होते. मात्र, दोन्ही अधिकारी बदलून जाताच या कामांना परत सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने कामे करण्यात आली आहे. एकंदरीतच वनतलावांना निधी मिळविण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचे दिसून येते. मात्र, आता प्रकरण अंगलट येण्याचे चिन्ह दिसून येत असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.
नोटशिटवर एकच नंबर
शिवनी वनपरिक्षेत्रात वनतलाव बांधण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हिवरा येथील वनतलावंच्या कागदपत्रांचा समावेश आहे. अंदाजपत्रकांच्या कागदपत्रात केवळ सातबारा व नकाशा हा शिवनीचा जोडण्यात आलेला आहे. तर चारही वनतलाच्या अंदाजपत्रकाला जोडण्यात आलेल्या ‘नोटशिट’वर अस्तित्वात नसलेला एकच कंमार्टमेंट नंबर ३५ नमूद करण्यात आलेला आहे.
पालकमंत्र्यांची दिशाभूल
पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतलेल्या नियोजन समितीची पहिल्या बैठकीत शिवनी वनतलावांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांनी ती फाईल तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्याकडे सादर करून त्यांच्या स्वाक्षरी घेतली. कागदपत्रांची जुळवाजुळव करून अंदाजपत्रकांवर स्वाक्षरी घेताना जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आले.
चौकशीचे आश्वासन
वनतलावांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले आहे. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी गुरूवारला नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना निवेदन दिले. यावेळी रेड्डी यांनी शहारे यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. यामुळे या प्रकरणात वनविभगाचे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बदल्या होताच आदेश
शिवनीच्या वनतलावांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. यामुळे तत्कालीन उपवनसंरक्षक विनय ठाकरे व वनपरिक्षेत्राधिकारी लोंढे यांनी काम बंद केले होते. कालांतराने दोघांचीही बदली झाली. ही संधी साधून शिवनीचे विद्यमान वनपरिक्षेत्राधिकारी डी. पी. चकोले यांनी सदर काम सुरू करण्याचे शिवनीच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीला निर्देश दिले.