वादग्रस्त जागेवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम

By Admin | Updated: March 26, 2015 00:34 IST2015-03-26T00:34:32+5:302015-03-26T00:34:32+5:30

परसोडी ग्रामपंचायत पदाधिकारी व राजकीय ठेकेदाराच्या सहकार्याने वादग्रस्त मालकी हक्काच्या जमिनीत सिमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे.

Construction of cement road in controversial area | वादग्रस्त जागेवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम

वादग्रस्त जागेवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम

सालेभाटा : परसोडी ग्रामपंचायत पदाधिकारी व राजकीय ठेकेदाराच्या सहकार्याने वादग्रस्त मालकी हक्काच्या जमिनीत सिमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मौजा परसोडी तलाठी साझा क्रमांक १ गट नंबर ६३/३ आराजी ०.२० हे.आर. मालकी हक्काची घनश्याम पटले यांची शेतजमीन आहे. सदरील गटात हरिश्चंद्र दिघोरे यांचे नावाने ०.०४ हे.आर. तर उर्वरीत ०.१६ हे.आर. घनश्याम पटले व चार वारसदारांचे नावाने आहे. या जमिनीबाबद रतीराम बोपचे नामक व्यक्ती विरुद्ध जिल्हाधिकारी भंडारा येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
तरीही ग्रामपंचायत परसोडीच्या पदाधिकाऱ्यांनी एका दिवसात ३५ मिटर लांब व ३.५ फुट रुंदीचा सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले.
मौजा परसोडी येथील गट नं. ६३/३ आराजी ०.१६ या शेत जमिनीचा मालक घनश्याम पटले यांनी खंडविकास अधिकारी, लाखनी ग्रामपंचायत परसोडी पोलीस स्टेशन लाखनी, जिल्हाधिकारी भंडारा यांना १८ मार्चला सिमेंट रस्ता बांधकाम थांबविण्याबाबत तक्रार दाखल केली. परंतु तक्रार अर्जावर वरिष्ठांनी दखल न घेतल्यामुळे ग्रामपंचायतीला सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यास रान मोकळे करून दिले. जमीन मालकावर अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत परसोडी यांनी तयार केलेल्या सिमेंट रस्त्याने कुणीही जात नाही. साधी पायवाट नाही. तरीही सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून शासकीय निधीला चुना लावण्याचा षडयंत्रच रचला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. विद्यमान ग्रामपंचायत परसोडी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१५ मध्ये संपत आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यंत उखळ पांढरे करून मोकळे होण्याचे मार्गावर दिसत आहेत.
सद्यस्थितीत ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्ते व नालीचे बांधकाम युद्ध पातळीवर चालू असून ठेकेदारी वसंत कुंभरे, उपसभापती पंचायत समिती लाखनी हे करीत असल्याचे बोलल्या जात आहे. शेतजमीन मालकांनी सिमेंट रस्ता बांधकाम २१ मार्चला अडविला असता ग्रामपंचायत पदाधिकारी व जमीन मालक घनश्याम पटले यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस पाटील परसोडी यांनी लाखनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस अधिकारी घटनास्थळी वेळीच पोहचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अशा चर्चेला गावात उत आला आहे.
ग्रामपंचायत परसोडीच्या पदाधिकाऱ्यांनी सिमेंट रस्ता बांधकाम करण्यापूर्वी जमिन मालकाला सूचना देणे गरजेचे आहे. मात्र, कसलीही सूचना न देता ग्रामपंचायतची मालमत्ता समजून बिनभोभाटपणे रस्ता बांधकाम केला आहे.
सदरील सिमेंट रस्ताच्या अंदाजपत्रकात ५० मिटर लांबीचा असून प्रत्यक्षात ३५ मिटरच सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आलेला आहे. १५ मिटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम न करताचा निधी गिळंकृत करण्याचा बेत दिसून येत आहे.
बांधकाम विभाग पंचायत समिती लाखनी येथील संबंधीत विभागाचे कर्मचारी मौका चौकशी न करताच अंदाजपत्रक तयार करून मुळ मालकांना आर्थिक व मानसिक त्रास पंचायत समितीचे कर्मचारी देत आहेत. असा आरोप जमीन मालक यांनी केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रीत करून दोषी ग्रामपंचायत पदाधिकारी, ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर न्याय मागणीसाठी उपोषण करण्यात येईल, असा इशारा घनश्याम पटले यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकरण न्यायदानासाठी ठेवलेले असताना ग्रामपंचायतीने केलेल्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Construction of cement road in controversial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.