कारली वितरिकेचे बांधकाम अर्धवट
By Admin | Updated: June 13, 2016 02:05 IST2016-06-13T02:03:29+5:302016-06-13T02:05:56+5:30
तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली येथे सन २००६-१७ या कालावधीत वितरिकेचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र हे बांधकाम मध्यंतरीच रखडले.

कारली वितरिकेचे बांधकाम अर्धवट
पवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली येथे सन २००६-१७ या कालावधीत वितरिकेचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र हे बांधकाम मध्यंतरीच रखडले. त्यामुळे परिसरातील कारली, गर्रा, आसलपाणी, मोहगाव, जोगेवाडा, चिचोली, भोंडकी, मोखेटोला येथील शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यामुळे वंचित राहावे लागले. त्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
बावनथडी प्रकल्पाचा उजवा कालव्यावरील कारली वितरिकेचे काम सन २००६-०७ कालावधीत सुरु झाले. परंतु बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही. या वितरिकेवर गर्रा ३९३.५० एकर, कारली ८३०.५० एकर, आसलपाणी ४५६ एकर, चिचोली १,००२.८७ एकर, भोंडकी ५५१.४० एकर, मोठागाव २०५.९७ एकर, जोगेवाडा १४८.९२ एकर शेतजमीन आहे. शासनाला महसूल पाठविण्याकरिता शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. मात्र पाणी मिळत नाही. याबाबत अनेकदा तक्रार दिली. कुणीही पुढाकार घेतला नाही. प्रशासन किती सुस्त आहे असे म्हणायला हरकत नाही. जंगलव्याप्त भागात वसलेला कारली गावात ९० टक्के आदिवासी बांधव आहेत. शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे दुष्काळामुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे. याबाबत बावनथडी प्रकल्प सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांना ही बाब अनेकदा लक्षात आणून दिली तरी कुणीही लक्ष दिले नाही. केवळ आश्वासन देण्यात आले. येथील शेतकऱ्याचा मुख्य भात पिक असून यावर्षी देखील पिकाची लागवड करण्यात येईल तरी कारली वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे. (वार्ताहर)