स्वेच्छा अनुदानासाठी एकवटले खापरीवासीय
By Admin | Updated: April 27, 2016 00:26 IST2016-04-27T00:26:28+5:302016-04-27T00:26:28+5:30
पंचायतराज धोरणानुसार ग्रामसभेला महत्व प्राप्त झालेले असून गाव करी ते राव न करी याचा प्रत्यय खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनासंदर्भात घेण्यात आलेल्या...

स्वेच्छा अनुदानासाठी एकवटले खापरीवासीय
७० कुटुंबांनी घेतला निर्णय : विशेष ग्रामसभेत झाला ठराव
अशोक पारधी पवनी
पंचायतराज धोरणानुसार ग्रामसभेला महत्व प्राप्त झालेले असून गाव करी ते राव न करी याचा प्रत्यय खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनासंदर्भात घेण्यात आलेल्या ग्रामसभेने दाखवून दिले. स्वेच्छा पुनर्वसनासाठी सभाच घ्यायची नाही अशी भूमिका असताना नागरिकांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ५०० च्या पुढे उपस्थिती असलेल्या विशेष सभेत ७० टक्के कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचे बाजूने तर ३० टक्के कुटुंबांनी गावठाणच्या बाजूने मतदान केले.
गोसीखुर्द प्रकल्पामुळे खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनाचा मुद्दा गेली कित्येक वर्षे नोकरशाहीत अडून राहिला. त्या गावाला पाहिजे तेवढी जमीन प्रकल्पाचा पुनर्वसन विभाग उपलब्ध करून देवू शकला नाही. गोसीखुर्द प्रकल्प व त्याहीपेक्षा जास्त त्रास उमरेड, कऱ्हांडला, पवनी अभयाण्यातील हिंस्त्र प्राण्यांपासून नागरिकांना होवू लागला होता. कित्येक कुटुंबांनी स्वत:चे कुटुंब नाईलाजाने स्थलांतरीत केलेले होते. अशा परिस्थितीत लोकांची मागणी विचारात घेणे गरजेचे होते. त्यामुळे ग्रामसभेशिवाय पर्याय उरलेला नव्हता. अखेर सोमवारला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. कधी नव्हे एवढी उपस्थिती ग्रामसभेला होती.
दिवसभर पाच ते सहा तास ग्रामसभा चालली. सुरुवातीला ग्रामसभेचे अध्यक्ष महणून सुनिल श्रीहरी ढोणे यांची आवजी मतदानाने निवड झाल्यानंतर सभा सुरु झाली. खापरी (रेहपाडे) गावाला स्वेच्छा अनुदान की भूखंड या एकमेव विषयावर चर्चा करण्यात आली.
ग्रामसभेच्या सदस्यांचे मतदान घेण्यात आले. तेव्हा ७० टक्के लोकांनी स्वेच्छा अनुदान पाहिजे या बाजूने मतदान केले ३० टक्के लोकांनी भूखंड पाहिजे या बाजूने मतदान केले. ७० टक्के व ८० टक्के लोकांनी स्वेच्छा अनुदान की भूखंड पाहिजे ते नमुना अर्ज भरून दोन किंवा तीन दिवसात ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर करावे असे ठरावात नमूद करण्यात आले.
पवनी तालुक्यात पहिल्यांदाच अशा विषयावर सभा घेण्यात आल्याने बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक मधुकर गीते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व अन्य सदस्य सुद्धा उपस्थित होते. ग्रामसेवक काटेखाये यांनी विशेष ग्रामसभेचा ठराव वाचून दाखविला व सभेचा समारोप झाला.