स्वतंत्र विदर्भ व शेतकरी हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार
By Admin | Updated: August 10, 2016 00:16 IST2016-08-10T00:16:15+5:302016-08-10T00:16:15+5:30
जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली.

स्वतंत्र विदर्भ व शेतकरी हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार
भाजप शेतकरी विरोधी : नितीन राऊत यांची पत्रपरिषदेत माहिती
साकोली : जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली. सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी राऊत म्हणाले, ऐन पावसाळ्यात कृषीपंपाचे १६ तासाचे भारनियमन सुरु आहे. त्यामुळे रोवणी खोळंबली असून शेतकऱ्यांना हमी भावही मिळाला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात अशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली असून उद्योगपतींना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी उद्योगपतींचे बुडालेले कर्ज शासकीय तिजोरीतून देत आहेत. ज्या जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली तीच जनता आता पश्चाताप करीत आहे.
भाजपने २०१४ ची निवडणूक स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढली. आता केंद्रात व राज्यात त्यांचीच सत्ता आहे. वेगळा विदर्भ का करीत नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, एकीकडे भाजपाचे आमदार व खासदार विदर्भाचा प्रस्ताव आणतात तर दुसरीकडे त्यांचेच मुख्यमंत्री मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे असे सांगून दिशाभूल करतात. विदर्भ वेगळा व्हावा ही काँग्रेसची इच्छा असून आता वेगळा विदर्भ व्हावा यासाठी विदर्भातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यातून सर्वानुमताचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून वेगळ्या विदर्भासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हाननद करंजेकर, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, डॉ.अजय तुमसरे, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, मंदा गणवीर, पंचायत समिती सदस्य छाया पटले, माजी सरपंच हेमलता परसगडे, माजी सभापती क्रिष्णा मेश्राम, माजी सभापती ताराबाई तरजुले, माजी उपसभापती नरेश नगरीकर, माजी सभापती केवळराम लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आधी आठ जिल्हे वेगळे करा
विदर्भाची मागणी आमची आहे. तत्पूर्वी विदर्भातील आठ नव्या जिल्ह्याची घोषणा करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना आम्ही केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी नवीन जिल्ह्याच्या प्रस्तावालाही केराची टोपली दाखविली. या आठ जिल्ह्यात साकोली जिल्ह्याचाही समावेश आहे.
कामाला लागा
माजी मंत्री नितीन राऊत यांनी जाताजाता जिल्हा सचिव डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांना आता कामाला लागा, असे सर्वासमोर सांगितले. आगामी पालिका निवडणुकीसाठी की विधानसभा निवडणुकीसाठी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यांनी दिलेला इशारा इतरांना पेचात पाडणारा होता.
नगरपरिषद निवडणुका वेळेवर पाहू
आगामी नगरपरिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडीसंदर्भात विचारले असता तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.