बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:20 IST2017-02-07T00:20:36+5:302017-02-07T00:20:36+5:30
लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला.

बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडा
लाखांदूर येथील निवडणूक : काँग्रेस-राकाँचे १२, भाजपा ६ तर अपक्ष १ जागेवर विजयी
लाखांदूर : लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला. भारतीय जनता पार्टी समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनेलला ६ जागांवर विजय मिळविता आला. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
१९ संचालकपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण जागेतून नरेश खरकाटे, विलास तिघरे, सुभाष राऊत, नरेश दिवठे, वामन बेदरे, तेजराम दिवठे, नरेश बेदरे हे विजयी झाले. याच मतदार संघातील महिला राखीव गटातून नीमा ठाकरे व उर्मिला राऊत या विजयी झाल्या. ईतर मागासवर्गीय राखीव जागेतून विजय फुंडे, विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार गटातून गजानन दिघोरे हे विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून संजय कोरे व देविदास राऊत हे विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून धनराज ढोरे, अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून सुनील भोवते, व्यापारी, अडत्या मतदार गटातून मुकेश भैय्या व गोपीचंद राऊत, हमाल (तोलारी) गटातून मनोज मेश्राम, विपणन व प्रक्रिया मतदार गटातून अपक्ष उमेदवार सुरेश ब्राम्हणकर हे विजयी झाले. भाजपने बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे सहा प्रशासक बाजार समितीवर असताना या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले मात्र सहकार क्षेत्रातील मतदारांनी भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले. काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होऊन एकत्रित निवडणूक लढविल्याने त्यांना बाजार समितीवर निर्विवाद सत्ता काबीज करता आली.
यापूर्वी प्रशासक म्हणून काही काळ बाजार समितीचा कारभार सांभाळणारा भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी धडपड करीत असला तरी कांग्रेसचे पदाधिकारी व माजी आमदार सेवक वाघाये यांनी विजय मिळविला. कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, रमेश डोंगरे, प्रदीप बुराडे, तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, राष्ट्रवादीचे बालू चुन्ने यांच्या चमूने प्रयत्न करून सांघिक विजय मिळविला. निवडणूक निर्णय अधिकारी एस.जे हटवार, सहाय्यक निबंधक ए.के.मेंडूले यांनी कम पहिले तर पोलीस निरीक्षक देविदास भोयर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकालाची घोषणा झाल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. (शहर प्रतिनिधी)