काँग्रेस-राकाँचे उमेदवार तीर्थस्थळी रवाना !
By Admin | Updated: July 14, 2015 01:12 IST2015-07-14T01:12:26+5:302015-07-14T01:12:26+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक १९ जागा जिंकून काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी कुण्या एका पक्षाकडे स्पष्ट

काँग्रेस-राकाँचे उमेदवार तीर्थस्थळी रवाना !
भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक १९ जागा जिंकून काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी कुण्या एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस, राकाँने पुढाकार घेतला असून या पक्षाचे नवनियुक्त सदस्य रविवारी रात्री देवदर्शनाला निघाले आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता नेमकी कुणाची बसते हे कोडे बुधवारला दुपारी सुटेल.
भंडारा जिल्हा परिषदेत काँगे्रस १९, राकाँ १५, भाजप १३, अपक्ष ४, शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. मागील पाच वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस व राकाँने सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. असे असले तरी या दोन्ही नवनियुक्त सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले आहेत.
काँग्रेस पक्षाच्या वाहनात १९ सदस्यांसह दोन सदस्यांचा समावेश असून हे २१ सदस्य पश्चिम महाराष्ट्रात देवदर्शनात मुक्कामी आहेत. राष्ट्रवादीच्या १५ सदस्यांसह एक अपक्ष १५० कि.मी. अंतरावरील तीर्थस्थळी आहेत. ही मंडळी बुधवारला सकाळी भंडाऱ्यात पोहोचणार आहे.
दरम्यान, देवदर्शनासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या एका नवनियुक्त सदस्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील जनतेने कौल दिला आहे. त्या कौलाचा काँग्रेस व राकाँने सन्मान करुन एकत्र आले पाहिजे. त्यासाठी दोन्ही पक्षाने एक पाऊल मागे घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यातील जनतेला न्याय दिल्यासारखे होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
राजकीय समीकरणाकडे नजरा
कालपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपच्या वाट्याला यावेळी केवळ अर्ध्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापण्यापासून भाजप दूर आहे. असे असले तरी गोंदिया जिल्ह्यातील चार पंचायत समितीमध्ये काँग्रेसने भाजपशी युती करुन राकाँला सत्तेबाहेर ठेवले. त्यामुळे बुधवारला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूक समिकरणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आता काँग्रेस व राष्ट्रवादीची पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेते त्यावर पुढील समिकरणे अवलंबून राहणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील काही पंचायत समितीमध्ये जो प्रकार घडला तसे झाले तर दोन्ही पक्ष टिकेचे लक्ष्य बनू शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. मागील कार्यकाळात भाजपचे संख्याबळ पुरेसे असतानाही दुसऱ्या अडीच वर्षात सत्ता स्थापन करताना भाजपला मोठी कसरत करावी लागली होती. त्यात भाजप यशस्वी झाली होती. आता बुधवारच्या निवडणुकीत काय होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.