काँग्रेसने शेतकऱ्यांना खाईत लोटले
By Admin | Updated: June 28, 2015 00:43 IST2015-06-28T00:43:50+5:302015-06-28T00:43:50+5:30
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचेच सरकार होते. या ६० वर्षात काँग्रेसने गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजुरांना काहीही दिले नाही.

काँग्रेसने शेतकऱ्यांना खाईत लोटले
सेंदुरवाफा येथे प्रचारसभा : नितीन गडकरी यांची घणाघाती टीका
साकोली : स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचेच सरकार होते. या ६० वर्षात काँग्रेसने गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजुरांना काहीही दिले नाही. ६० वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी, पक्षाला कंटाळून आत्महत्याच केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने ६० वर्षात काही न करता एका वर्षाच्या भाजप सरकावर टीका करीत आहेत. त्यामुळे साठ वर्षात तुम्ही काय केले, ते आधी सांगा नंतर आम्हाला विचारा, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सेंदूरवाफा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, उपेंद्र कोठेकर, डॉ.प्रकाश मालगावे, डॉ.उल्हास फडके, तारीक कुरैशी, शिवराम गिऱ्हेपुंजे, सभापती नारायण वरठे, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, वामनराव बेदरे, माजी सभापती रेखा भाजीपाले, महिला तालुका अध्यक्ष इंद्रायणी कापगते, बंडू बोरकर, नेपाल रंगारी उपस्थित होते.
यावेळी ना.गडकरी म्हणाले, देशात काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशातील दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळांची अवस्था दयनीय होती. यापूर्वीच्या भाजपच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १.७० लाख गावांना पक्के रस्ते तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात तयार करण्यात आले.
आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात जलमार्ग विकसीत करण्यात येणार आहे. यापासून रोजगार निर्मिती होणार आहे.
जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत १६ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडून या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर्षी लाखनी, साकोली व सौंदड येथून उड्डान पुलाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. जाहीर सभेचे संचालन माजी सभापती गीता कापगते यांनी केले. कार्यक्रमाला किशोर पोगडे, नितीन खेडीकर, मंदार खेडीकर, ललीत खराबे, भिमावती पटले यांच्यासह भाजपचे महामंत्री भरत खंडाईत, डॉ.उल्हास बुराडे, सत्यवान हुकरे, बबलु निंबेकर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवारांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
तुमसरातील धान घोटाळ्याची चौकशी होणार
काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यात घोटाळेच घोटाळे झाले. तुमसर येथे कोट्यवधीचा झालेल्या धान घोटाळ्याची आता लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. विरोधी पक्षातील लोक भाजपावर आरोप करून धानाच्या पेंड्या जाळणारे व पदयात्रा काढणारे आता कुठे गेले? असा सवाल करीत आहेत. त्यांना एवढेच सांगायचे की, नाना पटोले पूर्वीही शेतकऱ्यांच्या पाठिशी होते व आताही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी यावेळी दिली.