काँग्रेसचा मोर्चा ; वाघायेंची पदयात्रा

By Admin | Updated: May 8, 2015 00:38 IST2015-05-08T00:38:32+5:302015-05-08T00:38:32+5:30

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने ...

Congress Front; The Walking Tour of Wagah | काँग्रेसचा मोर्चा ; वाघायेंची पदयात्रा

काँग्रेसचा मोर्चा ; वाघायेंची पदयात्रा

भंडारा : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वात मुंडीपार ते भंडारा अशी पदयात्रा काढण्यात आली.
जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने गुरूवारला दुपारी १२ च्या सुमारास शास्त्री चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, राजेंद्र मुळक, माजी आमदार आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रमिला कुटे, जिल्हा महासचिव बशिर पटेल, रहिम पटेल, अ‍ॅड.दिलीप भोयर उपस्थित होते.
शास्त्रीनगरातून निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गाने त्रिमूर्ती चौकात पोहोचला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. विखे पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध टीका केली. शेतकरी देशोधडीला लागला असताना पंतप्रधान विदेशवारी करण्यात मग्न आहेत. धानासाठी लढणारे, ‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखविणारे नेते आता कुठे गेले असा प्रश्न करुन हे शासन शेतकऱ्यांचे नसून उद्योगपतींचे असल्याचा आरोप केला.
यावेळी माणिकराव ठाकरे, राजेंद्र मुळक, विजय वडेट्टीवार यांनीही धानाला हमीभाव नाही, केरोसीनचा कोटा कमी करण्यात आला, ओबीसी विद्यार्थ्यांसह अन्य शिष्यवृती थकीत आहे. भारनियमनामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. या ज्वलंत मुद्यावर त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
अशा होत्या मागण्या
भूसंपादन कायदा रद्द करण्यात यावा, एपीएलधारकांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्यात यावा, धानाला प्रति क्विंटल ३,५०० रूपये भाव देण्यात यावा, केरीसीनचा कोटा पूर्ववत करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, भारनियमन बंद करण्यात यावे, दुधाला योगञय भाव देण्यात यावा, साखर कारखान्याकडून प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यात यावी, कोरडवाहू शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी २५ हजार रूपये तर ओलिताखालील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रूपये देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
मुंडीपार ते भंडारा पदयात्रा
माजी आमदार सेवक वाघाये यांनी मुंडीपार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. सकाळी ६ वाजतापासून सुरु झालेली ही पदयात्रा तब्बल ३० किलोमीटर अंतर पार करुन दुपारी अडीच वाजता भंडाऱ्यात पोहचली. पदयात्रा भंडाऱ्यात पोहोचल्यानंतर सेवक वाघाये यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण केले. त्यानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि सावकाराच्या कर्जामुळे त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणारे आता गेले कुठे? सत्तेत येताच त्यांची वाचा बंद झाली का? असे सांगून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस यावेत, त्यांना न्याय मिळावा यासाठी पदयात्रा काढल्याचे सांगून त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरुद्ध हल्लाबोल केला.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सरोज वाघाये, रुपलता जांभूळकर, विनायक बुरडे, धनंजय तिरपुडे, प्राचार्य होमराज कापगते, नंदू समरीत, केवळराम लांजेवार, मार्तंड भेंडारकर, पप्पु गिऱ्हेपुंजे, सुनिल गिऱ्हेपुंजे, विनायक बुरडे, बाळा शिवणकर, मनोहर महावाडे, विकास वासनिक, राजू निर्वाण, रुपेश खवास आदींसह साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congress Front; The Walking Tour of Wagah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.