राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीविषयी संभ्रमावस्था
By Admin | Updated: December 18, 2015 01:02 IST2015-12-18T01:02:36+5:302015-12-18T01:02:36+5:30
साकोली लाखांदूर वडसा राज्य महामार्ग क्रमांक २७२ चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीविषयी संभ्रमावस्था
सासरा : साकोली लाखांदूर वडसा राज्य महामार्ग क्रमांक २७२ चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासंबंधाने संबंधित यंत्रणेने या मार्गाचा सर्वे केला. रुंदीकरणाविषयक मोजमाप केली. या मार्गात अनेक लहान मोठी गावे आहेत. हा मार्ग काही गावांच्या आतून तर काही गावांच्या बाहेरून गेला आहे.
या मार्गातील सानगडी हे गाव आकाराने मोठे असलेले गाव आहे. सदर राज्यमार्ग क्र. २७२ या गावाच्या माध्यमातून गेला आहे. हा गाव लांबीने अधिक असल्याने या ठिकाणी दोन बसस्टँड आहेत. या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यासंबंधी शासन प्रशासनाकडून घोषणा झाल्याची चर्चा आहे. सानगडी गावातून गेलेला हा मार्ग सध्या सर्वांच्या सोयीचा समजला जातो. हा येथील मुख्य मार्ग असल्याने येथील संपूर्ण मार्केटिंग या मार्गाच्या कडेला आहे.
या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्यास हा मार्ग नेमका कोठून जाईल? आतून की बाहेरून? असे प्रश्न येथील नागरिकांसमोर उभे आहेत. हा मार्ग सानगडी गावाच्या आतून गेल्यास या मार्गाच्या कडेला असलेली अनेक घरे उध्वस्त होतील. बाहेरून गेल्यास या गावातील नागरिकांची बरीच मोठी शेती जाईल आणि सानगडी गाव बाजूला राहील. हा मार्ग नेमका कोठून जाईल याविषयी शासन प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्याने तसेच हा मार्ग नेमका किती रुंद असेल याविषयी नागरिकांना जाहीर निवेदनातून न कळविल्या गेल्याने येथील नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शासन प्रशासनाने या मार्गाविषयी इत्यंभूत माहिती जाहीर निवेदनातून प्रसिद्ध करावी, अशी या मार्गातील गावांमधील नागरिकांची मागणी आहे. यामुळे नागरिकांना पुढचे धोरण आखता येईल.
(वार्ताहर)