स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा
By Admin | Updated: February 26, 2017 00:32 IST2017-02-26T00:32:41+5:302017-02-26T00:32:41+5:30
अभ्यासाचे नियोजन व मेहनतीच्या भरवशावर स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे शक्य असले तरी....

स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा
बिपीन इटनकर : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, ग्रुप स्टडीवर भर द्या, मुलाखतीची तयारी करा
भंडारा : अभ्यासाचे नियोजन व मेहनतीच्या भरवशावर स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे शक्य असले तरी स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन २०१४ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी व गडचिरोली जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गौतम वाकोडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
करंट अफेअर्सच्या तयारीसाठी नियमित दोन तास वृत्तपत्र वाचन आवश्यक आहे. या सोबतच चालु घडामोडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करुन लिहिण्याचा सराव स्पर्धा परीक्षेच्या यशाचे गमक असल्याचे इटनकर यांनी सांगितले. प्रत्येक विषयाच्या स्वत:च्या अशा नोटस् असायला हव्यात. या नोटसचे नियमित रिव्हीजन व्हायला हवे व सोबतचे मागील ५ ते १० वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचे अवलोकन करुन सोडवणे या बाबी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एन.सी.ई.आर.टी.ची जूनी पुस्तके अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून इटनकर म्हणाले की, तयारीसाठी विद्यार्थ्यांनी ग्रृप स्टडीला प्राधान्य दिले पाहिजे. यासोबतच एखादा छंद जोपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित वृत्तपत्र वाचनाने केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या तयारीला मोठा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या घडनांचे विश्लेषण करायला शिका व ते शब्दबध्द करा असा सल्ला त्यांनी दिला. पराभवाने खचून न जाता आत्मविश्वासाने व जोमाने परीक्षेचा सामना करा, असा मोलाचा सल्ला इटनकर यांनी दिला. इटनकर यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तर देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविला.
स्पर्धा परीक्षा ही कसोटी असली तरी आपले उद्दिष्ट स्पष्ट असल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी व्यक्त केला. स्वत: मधील स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखून ध्येय निवडा असा सल्ला देतांना जोगदंड म्हणाले की, पराभवाने खचून न जाता मेहनत व सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे अवघड नाही. वेळेच्या व्यवस्थापनासोबतच अभ्यासाचे व्यवस्थापन महत्वाचे असून आपल्या मधील क्षमता ओळखा व त्यानुसार क्षेत्र निवडा असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गौतम वाकोडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रमोद गणविर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)