युनानी औषधांचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:58 IST2016-04-20T00:58:54+5:302016-04-20T00:58:54+5:30
नानाविध औषधोपचार करुनही पांढऱ्या व्रणाचा आजार बरा होत नसलेल्या रुग्णांना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात युनानी पध्दतीच्या औषधोपचाराने लाभ झाला आहे.

युनानी औषधांचा ठणठणाट
रुग्णांची पायपीट : मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
सिराज शेख मोहाडी
नानाविध औषधोपचार करुनही पांढऱ्या व्रणाचा आजार बरा होत नसलेल्या रुग्णांना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात युनानी पध्दतीच्या औषधोपचाराने लाभ झाला आहे. शरीरावरील पांढऱ्या व्रणाच्या रुग्णांचा ओघ मोहाडीकडे वळल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या आजारावरील औषधीच रूग्णालयात उपलब्ध नाही. औषधासाठी अशा रुग्णांना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात पायपीट करावी लागत आहे.
एकीकडे औषध खरेदी प्रकरण गाजत असताना आवश्यक औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णात असंतोष आहे.मोहाडी ग्रामीण रुग्णालयात आयुष विभागांतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथीक व युनानी औषधोपचार पध्दती सुरु आहे. यात शरीरावरील पांढऱ्या व्रणासाठी युनानी औषधोपचार पध्दती रामबाण समजली जात आहे. साधारणत: पांढरे व्रण असणाऱ्या व्यक्तिना समस्यांना तोंड द्यावे लागते.
औषधोपचार करुनही हा आजार पुर्णत: बरा होत नाही. मात्र युनानी औषधोपचाराने साकोली तालुक्यातील एकोडी येथील ६५ वर्षीय महिलेला ९० टक्के लाभ झाला. त्यांना मागील १६ वर्षापासून हा आजार होता. रामटेक, खरबी, पालेडोंगरी, रोहा, सालई (खुर्द), विहिरगांव या गावातील काही रुग्णांना युनानी औषधोपचाराने लाभ झाला. याप्रकारच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पांढऱ्या व्रणावरील औषधोपचारातील मुख्य औषधच ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे काही रुग्णांनी भंडारा येथे जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेतली व औषध तुटवड्यामुळे होणारी व्यथा मांडली. मात्र अजुनपर्यंत तोडगा निघालेला नाही. पांढऱ्या व्रणाच्या रुग्णांना युनानी औषधोपचार पध्दतीने त्यांना पुन्हा नविन जीवन जगण्याची आशा पल्लवीत केली आहे. अनेकांच्या शरीरावरचे पांढरे डाग नाहीसे होऊन सामान्यासारखी त्वचा झाली आहे. वयात आलेल्या मुलींचे लग्न या आजारामुळे जमत नव्हते. आता त्यांच्या जिवनात आशेचे किरण दिसायला लागले आहेत.