मालकी पट्ट्यासाठी संघर्ष
By Admin | Updated: September 6, 2014 23:32 IST2014-09-06T23:32:21+5:302014-09-06T23:32:21+5:30
सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावरून जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले. मात्र अजुनही गावकऱ्यांकडे घर बांधलेल्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे नाहीत.

मालकी पट्ट्यासाठी संघर्ष
प्रकरण थंडबस्त्यात : व्यथा पुनर्वसित ढिवरवाडा गावाची
युवराज गोमासे ल्ल करडी/पालोरा
भंडारा : सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावरून जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले. मात्र अजुनही गावकऱ्यांकडे घर बांधलेल्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे नाहीत. गत ५४ वर्षांपासून ग्रामवासियांचा संघर्ष सुरू असला तरी आजही न्याय मिळालेला नाही. शासन प्रशासन दरबारी प्रकरण थंडबस्त्यात आहे.
मोहाडी व भंडारा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर नव्यानेच निर्माण झालेल्या कोका वन्यजीव अभयारण्या शेजारी पुनर्वसित ढिवरवाडा गावाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या जुना ढिवरवाडा गावाला वारंवार पुराचे चटके बसत होते. पुरामुळे गावाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. चोहोबाजुने गावाला पुराने वेढा घातला जायचा. गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होत असताना जिवितहानीचा सामनाही करावा लागत होता. पुरापासून बचाव करण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरून बऱ्याचदा प्रयत्न झाले. अखेर सन १९६० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशान्वये जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाचे जागेत पुनर्वसित करण्यात आले. त्याला ५४ वर्षाचा काळ लोटत आहे. निस्सार पत्रकानुसार वनविभागाच्या १६२ गटातील जागेत गावाचे पुनर्वसन करण्यात आले. जंगलातील झाडांची कटाई करून गावाला जमिन उपलब्ध करून देण्यात आली.
गावाच्या सोयीसुविधांसाठी सार्वजनिक तरतुदीनुसार स्मशानभूमी, ढोरफोडी, आखर, गुरे चराईसाठी जागा मिळावी यासाठी ढिवरवाडावासियांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र वनविभाग व महसूल विभागाच्या वादात प्रकरणी न्याय मिळालेला नाही. गावातील नागरिकांना घरांसाठी जागेचे वाटप करण्यात आले. मात्र मालकी हक्काचे पट्टे अजुनही वाटप झालेले नाहीत. गाव मालकी हक्कांपासून वंचित आहे. मालकी हक्काची लढाई आजही सुरू आहे.