जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांचा साठा जप्त करा
By Admin | Updated: October 22, 2014 23:13 IST2014-10-22T23:13:16+5:302014-10-22T23:13:16+5:30
जिल्ह्यातील फटाक्यांच्या ठोक विक्रेत्यांकडून गोडाऊन मधील फटाके तपासावेत. त्यातील सुतळी बाँब, रॉकेट बॉम्ब, सेव्हन शॉट बाँब इत्यादी आवाज करणारे फटाके फोटून त्यांची तिव्रता मोजावी.

जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांचा साठा जप्त करा
भंडारा : जिल्ह्यातील फटाक्यांच्या ठोक विक्रेत्यांकडून गोडाऊन मधील फटाके तपासावेत. त्यातील सुतळी बाँब, रॉकेट बॉम्ब, सेव्हन शॉट बाँब इत्यादी आवाज करणारे फटाके फोटून त्यांची तिव्रता मोजावी. १२५ डेसीबलपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या संपूर्ण फटाक्यांचा साठा जप्त करावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी दिले.
राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार फटाक्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी व ध्वनीप्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यासाठी बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.हरीत लवादाच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी पोलीस उपअधीक्षक (गृह), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, मुख्य विस्फोटक नियंत्रक नागपूर यांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक उपविभागस्तरावर अशाच समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
या बैठकीला पोलीस अधीक्षक कैलाश कणसे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमसी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, विस्फोटक विभागाचे क्षेत्र अधिकारी राहुल वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे, तुमसरचे तहसीलदार सचिन यादव, पोलीस निरीक्षक चव्हाण, जगदाळे, समीर हुंडलेकर, प्रदीप वडीचार उपस्थित होते. यावेळी अवैध व विनापरवाना आयात केलेल्या चीनी बनावटीच्या फटाक्यांचा साठा आढळून आल्यास तात्काळ जप्त करावा. शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भागात जसे शाळा, महाविद्यालय, न्यायालय इत्यादी ठिकाणी १२५ डेसीबलपेक्षा अधिक आवाजाची फटाके फोडल्या जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
तसेच निवडणुका घोषित झाल्यानंतर निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये कार्यकर्ते, व्यक्तींमुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची समिती खात्री करेल. (प्रतिनिधी)