शेतकऱ्याने दिलेल्या मदतीतून शाळा झाली संगणकीकृत
By Admin | Updated: December 13, 2014 22:32 IST2014-12-13T22:32:54+5:302014-12-13T22:32:54+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पालक आणि समाजाच्या सहकार्यातून गुणवत्ता विकासाचे खराशी शाळेचा उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरला आहे. आता हा उपक्रम जिल्ह्यातील संपूर्ण

शेतकऱ्याने दिलेल्या मदतीतून शाळा झाली संगणकीकृत
गवराळा येथील उपक्रम : मुबारक सय्यद यांचा पुढाकार
भंडारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पालक आणि समाजाच्या सहकार्यातून गुणवत्ता विकासाचे खराशी शाळेचा उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरला आहे. आता हा उपक्रम जिल्ह्यातील संपूर्ण शाळांमध्ये राबविण्यासाठी खराशी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैय्यद हे धडपडत आहेत.
त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गवराळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील सरपाते यांनी मुबारक सैय्यद यांना गवराळा येथील पालक सभेला मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सैय्यद यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्जनासाठी केलेले दान कसे सर्वश्रेष्ठ असते, हे ग्रामस्थांना पटवून दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाने भारावलेले गवराळा येथील शेतकरी प्रभाकर खरकाटे यांनी स्वत:चे पाल्य जिल्हा परिषद शाळेत शिकत नसतानाही ही शाळा संगणकीकृत व्हावी, यासाठी एक लाख रुपयांचा वैयक्तिक निधी मुख्याध्यापक सरपाते यांच्या स्वाधीन केले. या देणगीमधून या शाळेत सात संगणक लावण्यात आले. आता या शाळेत अद्ययावत संगणक प्रयोगशाळा साकार झाली आहे.
गवराळा जिल्हा परिषद शाळा मुबारक सैय्यद यांनी दत्तक घेतली आहे. गवराळा शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सरपाते हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून गुणवत्ता विकासासाठी धडपडत आहेत. मागील दोन वर्षात या शाळेचे दोन विद्यार्थी नवोदयला तर चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
मुबारक सैय्यद यांच्या मार्गदर्शनाने भारावलेल्या प्रभाकर खरकाटे यांचा सत्कार करण्यासाठी सय्यद यांनी पुढाकार घेतला. या सत्कार कार्यक्रमात खरकाटे यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आव्हान त्यांनी ग्रामस्थांना केले. त्यानंतर ग्रामस्थांनी तासाभरात एक लाख रुपयांचा निधी गोळा केला. या निधीतून शाळा सुसज्ज व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी ग्रामस्थांनी आणि समाजाने खरकाटे यांचा आदर्श घेतला तर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस येतील, यात शंका नाही. (जिल्हा प्रतिनिधी)