ग्रामपंचायत निवडणुकीचे संमिश्र निकाल

By Admin | Updated: April 19, 2016 00:36 IST2016-04-19T00:36:29+5:302016-04-19T00:36:29+5:30

राज्य निवडणूक विभागाच्या अधिसूचनेनुसार नव्यानेच तयार झालेल्या ग्रामपंचायतीसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली.

Composite results of Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीचे संमिश्र निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीचे संमिश्र निकाल

'कही खुशी कही गम'चा माहोल : तहसील परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
भंडारा : राज्य निवडणूक विभागाच्या अधिसूचनेनुसार नव्यानेच तयार झालेल्या ग्रामपंचायतीसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यात राजकीय पक्ष समर्थित विविध पॅनलच्या व स्वतंत्र उमेदवारांना संमिश्र यश प्राप्त झाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसुचनेनुसार अधिसुचनेनुसार भंडारा तालुक्यात भोजापूर, सिरसघाट, पिपरी, खैरी, केसलवाडा, सालेबर्डी, तिड्डी, खमाटा, बोरगाव, टेकेपार, सुरेवाडा, ईटगाव, संगम, बेरोडी तसेच पवनी तालुक्यातील सौंदड व टाकळी या ग्रामपंचायतीत निवडणुका होणार होत्या. दरम्यान, बेरोडी, सुरेवाडा, सौंदड व टाकळी येथील ग्रामस्थांनी पुनर्वसन विभागाच्या कारभाराविरोधात बहिष्कार टाकला. तसेच सिरसघाट ग्रामपंचायतीचे सात सदस्य अविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ ग्रामपंचायतींच्या ४३ प्रभागासाठी मतदान घेण्यात आले होते. निवडणूक व मतमोजणीची प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडली. तहसील परिसरात चोख बंदोबस्त होता.
आज सकाळी भंडारा येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणुकीत विजयी झालेले उमेदवारांच्या गळ्यात हार टाकून गुलाल लावून अनेकांनी विजयोत्सव साजरा केला.
गावात दाखल होताच विजयी उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळीत मिरवणूक काढण्यात आली.
नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत केसलवाडाच्या निवडणुकीत महेंद्र रामटेके, मंगेश सार्वे, मनिषा वैद्य, रोशन खोत, शामकला गिऱ्हेपुंजे, हर्षविना मेश्राम, गजानन तुमसरे, भावना बागडे, शतयू देशमुख हे विजयी झाले.
भोजापूर ग्रामपंचायत येथे विक्की निंबार्ते, संजय बांते, दिप्ती नागदेवे, मिना शेंडे, बाली मडावी, विना खोब्रागडे, वामन सुखदेवे, पुष्पशिल गणवीर आदींचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.
खमाटा-टाकडीत भोपे गटाचे वर्चस्व
आमगाव (दिघोरी) : खमाटा (टाकळी) या गटग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राजकुमार भोपे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे वर्चस्व निर्माण झाले असून मागील दहा वर्षापासून या ग्रामपंचायतवर असलेले पवनकर गटाचे वर्चस्व संपूष्टात आले आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य असून टाकळी येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे त्या गावातील निवडणुकीसाठी एकही उमेदवार उभे राहले नाही.
त्यामुळे येथे पाच सदस्यांसाठी निवडणूक लढण्यात आली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे मधुकर बिसन, भोपे, गौरी दिनेश राघोर्ते, रेखा गणेश ढेंगे व पवनकर गटाचे योगेश देवराम गायधने, मंजूषा जयंता आस्वले हे उमदेवार विजयी झाले. येथे सरपंच पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.
राजेदहेगावातील सरपंच-उपसरपंच अविरोध
खरबी (नाका) : भंडारा तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत राजेदहेगाव येथे १८ एप्रिलला सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सरपंच पदासाठी रामचंद्र देवराव लेंडे यांचे एकमात्र नामनिदर्शनपत्र आल्यामुळे त्याची अविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली तसेच उपसरपंच पदासाठी सारिका धम्मरत्न डोंगरे यांच्या एकमात्र नामनिदर्शपत्र आल्यामुळे यांची सुद्धा अविरोध निवड करण्यात आली. ग्रा.पं सदस्यपदी भिमेश वसंता ढोबळे, संजीवकुमार दातुजी रोडगे, किरण महेंद्र थोटे, वैशाली गोविंदा उके, बबीता अमितकुमार हुमणे, वीणा सुधीर लेंडे, आशा दामोधर इटनकर आदींची निवड झाली होती.
निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर निकालाकडे ग्रामस्थाचे लक्ष लागले होते. सरंपच उपसरंपचासह संपूर्ण सदस्य व ग्रामस्थानी जल्लोष केला. निवडणूक अधिकारी म्हणून पं.स. भंडाराचे कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी ग्रामपंचायत सचिव युगांतर कांबळे यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवारांचे स्वागत जि.प. सदस्य प्रेम वनवे यांनी केले. भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकुमार राऊत यांनी सुद्धा स्वागत केले. विजयासाठी निरंजन मुस्कारे, दिलीप वैद्य, सुधीर लेंडे, विनोद लेंडे, दामोधर इटनकर, किशोर कळंबे, धम्म्रत्न डोंगरे यांनी सहकार्य केले. जि.प. सदस्य प्रेम वनवे यांनी मार्गदर्शन केले. (लोकमत चमू)

Web Title: Composite results of Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.