साकोलीत स्वयंचलित हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:03+5:302021-07-15T04:25:03+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे गत वर्षापासून ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेमधून ...

Completion of automatic weather system in Sakoli | साकोलीत स्वयंचलित हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण

साकोलीत स्वयंचलित हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे गत वर्षापासून ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेमधून जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र (दामू) स्थापन झाले आहे. हवामान व त्यातील बदलानुसार शेतकऱ्यांना छोट्यात छोट्या घटकाची माहिती व्हावी, याकरिता कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे स्वयंचलित हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली असून, आता याद्वारे हवामानाची आकडेवारी संकलित करण्यात येईल. यामध्ये कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा तासी वेग व वाऱ्याची दिशा, जमिनीतील ओलावा, जमिनीतील तापमान, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पर्जन्यमान या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे भविष्यात हवामानाचा अचूक अंदाज देता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंत माहिती मिळण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे योग्य नियोजन करता येईल.

कृषी सल्ला पत्रक आठवड्यातून दोनदा (मंगळवारी आणि शुक्रवारी) तयार करण्यात येते व व्हाॅट्स अ‍ॅप व एम. किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. यामध्ये माती परीक्षण, यांत्रिकीकरण, बीजप्रकिया, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पशूपालन व्यवस्थापन, आपत्कालीन पीक व्यवस्थापन, तसेच पीकनिहाय माहिती दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व मागील आठवड्यात अनुभवलेले हवामान यावर आधारित कृषी सल्ला पत्रिका तज्ञांच्या मार्गदर्शनातून तयार करून ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत सामाजिक माध्यमांद्वारे पोहोचविण्याचे काम हे केंद्र सतत करीत आहे.

बॉक्स

आठ घटकांची स्वयंचलित पद्धतीने मिळणार माहिती

देशातील १९६ जिल्हे हे हवामान बदलाबाबत संवेदनशील आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. दुसरीकडे राज्यातील दहा जिल्ह्यांतील स्वयंचलित हवामान केंद्र प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित झाली आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या सर्वेक्षणासाठी हवामान विभागाचे पथक पाहणीसाठी येणार आहे. जमिनीतील ओलाव्यापासून ते सूर्यप्रकाशाची प्रखरता अशा आठ घटकांची माहिती व्हाॅटस ॲप, मोबाईल टेक्स संदेश, एम किसान पोर्टल, तसेच शेतकरी प्रशिक्षणे व प्रक्षेत्र भेटी दरम्यान, तसेच कृषी व संलग्न विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. मधल्या काळात लॉकडाऊनमुळे हवामान केंद्र कार्यान्वित होण्याच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता जिल्ह्यातील हवामानाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच हवामानाचा अंदाज व कृषी विषयक सल्ला मिळणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. एन. एस. वझिरे यांनी केले आहे.

Web Title: Completion of automatic weather system in Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.