प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा
By Admin | Updated: August 7, 2016 00:21 IST2016-08-07T00:21:59+5:302016-08-07T00:21:59+5:30
जलयुक्त शिवार अभियान योजनेचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला.

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश : जलयुक्त शिवारचा आढावा
भंडारा : जलयुक्त शिवार अभियान योजनेचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. २०१५-१६ ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे अतिरिक्त कामे सुचवायची असल्यास १२ आॅगस्ट पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. नलिनी भोयर, उपवन संरक्षक यु. यु. वर्मा, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, दिलीप तलमले, शिल्पा सोनाले व उपसंचालक माधूरी सोनोने उपस्थित होते.
या बैठकीत २०१५-१६ मध्ये निवड केलेल्या ८६ गावातील अतिरिक्त कामे, विशेष निधी व सीएसआर निधी अंतर्गत पूर्ण झालेली कामे व प्रलंबित देयके, २०१६-१७ मध्ये वन विभाग व ग्रामपंचायत यांचा सुधारित आराखडा, २०१५-१६ मध्ये ८६ गावातील यंत्रणानिहाय पूर्ण केलेल्या विविध कामामुळे निर्माण झालेला पाणी साठा व उपलब्ध झालेले संरक्षित सिंचन, यंत्रणानिहाय मोबाईल फोटो अपलोडींग अहवाल, २०१६-१७ मध्ये प्रशासकीय मान्यता घ्यावयाची प्रस्तावित कामे, २०१५-१६ मध्ये यंत्रणानिहाय रद्द कामाची कारणासह यादी, महात्मा जलभूमी अभियानांतर्गत वाटप केलेला निधी व खर्चाचा आढावा, महात्मा भूमी जलभूमी अभियानांत तूटफुट दुरुस्ती करता निधी मागणी व वनराई बंधारा नियोजन या विषयाचा आढावा घेण्यात आला.
२०१५-१६ चे अतिरिक्त कामाचे प्रस्ताव १२ आॅगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ज्या गावात एका यंत्रणेने सिमेंट नाला बांध प्रस्तावित केले असेल त्या गावात दुसऱ्या यंत्रणेने सिमेंटनाला बांध प्रस्तावित करु नये असे ते म्हणाले. सिमेंट नालाबांधची कामे प्रस्तावित करतांना भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून सर्वेक्षण करुन घ्यावे.
विशेष निधीमधून बचत असल्यास ती कामे सुध्दा १२ आॅगस्टपर्यंतच प्रस्तावित करावी.
२०१६-१७ च्या प्रस्तावित कामासाठी १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मंजूर करुन घ्यावेत. जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावातील पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहिर घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
दुरुस्तीचे कामे करतांना एकाच कामाची वारंवार दुरुस्ती होऊ नये याची काळजी यंत्रणांनी घ्यावी. जलयुक्त शिवारमध्ये पंचायत विभागाने मजगी व विहिर पुर्नभरणाचे काम प्रत्येक गावात घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला सर्व विभागाचे प्रमुख व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. (नगर प्रतिनिधी)