१ हजार ४६५ विहिरींचे बांधकाम तातडीने पूर्ण करा
By Admin | Updated: February 23, 2015 01:07 IST2015-02-23T01:07:43+5:302015-02-23T01:07:43+5:30
रोजगार हमी योजनेतून घेण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे काम अपूर्णावस्थेत आहे. धडक मोहीम राबवून जिल्हयातील १,४६५ विहिरी पूर्ण करण्यावर भर द्यावा, ...

१ हजार ४६५ विहिरींचे बांधकाम तातडीने पूर्ण करा
दक्षता समितीची बैठक : पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना
भंडारा : रोजगार हमी योजनेतून घेण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे काम अपूर्णावस्थेत आहे. धडक मोहीम राबवून जिल्हयातील १,४६५ विहिरी पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना खासदार नाना पटोले यांनी जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती बैठकीच्या प्रसंगी दिले.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे भुजल पातळी खाली गेलेली आहे. याचा विचार करुन उन्हाळात पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेता त्यासाठी आताच उपाययोजना करा. तातडीने टंचाई जाणवणाऱ्या गांवामध्ये कामे सुरु करा, अशा सूचना जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार नाना पटोले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दक्षता व संनियत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशिवार, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा घेताना ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत तालुक्यात किती नळ योजना सुस्थितीत चालु आहेत आणि बंद आहेत याची माहिती खंडविकास अधिकाऱ्यांना नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर योजना योग्यपणे सुरु राहण्यासाठी लोकांनी पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करावी, यामध्ये लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आढाव्यात तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील ३० मजुरांचे वेतन पोस्टाच्या दिंरगाईमुळे ६ महिन्यांपासून झाले नसल्याची माहिती सभापती कलाम शेख यांनी दिली. याबाबत पोस्ट विभाग आणि खंडविकास अधिकारी यांनी लेखी उत्तर दयावे, याबाबत चौकशी करण्यात येईल, असे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. या बैठकीला प्रकल्प अधिकारी जेजूरकर, पंचायत समिती सभापती, निरज मेश्राम, अर्जुन मरसकोल्हे, नलिनी फरकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आडे, राठोड, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे, तहसिलदार, खंडविकास अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)