सरपंचांनी केली ‘मॉयल’ची तक्रार
By Admin | Updated: May 8, 2017 00:26 IST2017-05-08T00:26:03+5:302017-05-08T00:26:03+5:30
तुमसर तालुक्यातील चिखला येथे भूमीगत मॅग्नीजची खाण आहे. मॅग्नीज खाण अधिकाऱ्यांनी कामगारांच्या सदनिकेसह अन्य बांधकाम सुरु केले आहे.

सरपंचांनी केली ‘मॉयल’ची तक्रार
चौकशीची मागणी : सदनिका सीतासावंगीत
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील चिखला येथे भूमीगत मॅग्नीजची खाण आहे. मॅग्नीज खाण अधिकाऱ्यांनी कामगारांच्या सदनिकेसह अन्य बांधकाम सुरु केले आहे. खाण चिखल्यात असली तरी सदनिका बांधकाम सीतासांवगीत होत आहे. सरपंच दिलीप सोनवाने यांनी याप्रकरणी मॉयलच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे.
चिखला ग्रामपंचायतीने मॅग्नीज ओर इंडिया, नागपूर येथील अध्यक्ष तथा सह प्रबंधक निदेशक यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात नमूद केले की, चिखला मॉयल कडून कामगारांकरिता नविन सदनिका बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. सदर सदनिकांची कामे चिखला येथील दुर्गा चौक परिसरातील रिकाम्या भूखंडावर करावी. जेणेकरुन कामगारांना कामावर जाण्यास त्रास होणार नाही. काही वर्षापूर्वी कामगारांच्या सदनीका चिखला परिसरात करायला पाहिजे होते, परंतु त्या सदनिका सीतासावंगी येथे तयार करण्यात आल्या. येथे यापूर्वी एमपी मोठी व लहान मॉयल तथा बाबू लाइन कामगारांच्या सदनिका होत्या. त्या सदनिका मॉयल प्रशासनाने भूईसपाट केल्या होत्या.
येथील कामगारांना सीतासांवगी येथे स्थानांतरीत करण्यात आले होते. येथील कामगारांची नावे चिखला येथील मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्या कुटुंबियांना लागणारे प्रमाणपत्र चिखला ग्रामपंचायत देत आहे. मॉयलची खाण चिखल्याच्या नावाने आहे. मॉयल प्रशासन सर्व बांधकामे सीतासावंगी येथे करीत आहे. याचा लाभ चिखला गावाला होत नाही.
ग्रामपंचायतीला करापासून वंचित राहावे लागते. ग्रामपंचायतला येथे आर्थिक फटका बसत आहे. निवेदनावर चिखलाचे सरपंच दिलीप सोनवाने, शरीफ खा पठान, किशारे बानमारे, शेख इसराईल, प्यारेलाल धारगावे, सुरज वरकडे, संगीता अग्रवाल, दुर्गा उईके, गोदावरी सोनवाने, मंजुषा नारनवरे, किशोर हुमने, दिनेश कठोने, संपत बांगरे, मनोज झोडे यांच्यासह मान्यवरांचे हस्ताक्षर आहेत. सदर निवेदन माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खा. नाना पटोले, आ.चरण वाघमारे यांना देण्यात आले असून चौकशीची मागणी केली आहे.