महिलेची पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: September 23, 2016 00:46 IST2016-09-23T00:46:39+5:302016-09-23T00:46:39+5:30

एका परप्रांतीय तरूणीशी लग्न करून स्वगृही आणले. तिला शारीरिक व मानसिक त्रास देवून जीवे मारण्याची धमकी दिली.

Complaint against the woman's husband | महिलेची पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार

महिलेची पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार

दीड वर्षाची मुलगी पतीकडे :
दहा दिवसानंतरही तपास सुरूच

तुमसर : एका परप्रांतीय तरूणीशी लग्न करून स्वगृही आणले. तिला शारीरिक व मानसिक त्रास देवून जीवे मारण्याची धमकी दिली. दीड वर्षीय मुलीला स्वत:जवळ ठेवून घेतले. ती तरूणी देव्हाडी येथील महिला अल्पावास केंद्रात मुक्कामी आहे. पतीवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तरूणीने एका एनजीओची मदत घेतली आहे. पोलिसांचा तपास येथे संथगतीने सुरू आहे.
सन २०१३ मध्ये कुणाल रहांगडाले (२५) रा. डोंगरी बु. हा बेंगलोर येथे सेक्युरीटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तिथे त्याचा एका तरूणीशी परिचय झाला. नंतर त्यांनी लग्न केले. सदर तरूणी एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होती. सन २०१५ मध्ये दोघेही परत आले. त्यानंतर पती व घरच्यांनी महिलेला त्रास देणे सुरू केले. ही महिला अल्पसंख्यांक समाजाचीआहे. शारीरिक व मानसिक त्रास देणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी प्रकार सुरू होते. या प्रकरणात ही महिला एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
दरम्यान या महिलेला एक दीड वर्षाची मुलगी आहे. सध्या ती पतीजवळ आहे. माझ्या मुलीला परत आणून द्या, असा टाहो तिने फोडला आहे. काहीच होत नाही म्हणून १२ सप्टेंबर रोजी पती विरोधात गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. गोबरवाही पोलिसांनी भादंवी ४९८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. सध्या गोबरवाही पोलीस तपास करीत आहे. सदर महिलेने सुकरमासेवा फाऊंडेशन तुमसर या एनजीओची मदत घेतली. तिला देव्हाडी येथील महिला अल्पावास गृहात ठेवण्यात आले आहे. सुकरमासेवा फाऊंडेशनचे संदीप शुक्ला, सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई बावनकर, सविता मदनकर यांनी मदतीचा हात दिला आहे. तुमसर पोलीस ठाण्यातील महिला समुदेशन केंद्रात ही याबाबत कळविण्यात आले आहे.
गुरूवारी पिडीत महिला एनजीओ पदाधिकाऱ्यांसोबत पुन्हा सायंकाळी चार वाजता तुमसर पोलीस ठाण्यात पतीसोबत झालेल्या संभाषणाची फित घेवून गेली होती. परंतु त्यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यास सांगितले. परप्रांतात मी एकटी महिलाकाय करू असे या महिलेची व्यथा आहे. शुक्रवारी पुन्हा गोबरवाही पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदविण्यात येईल, असे सुकरमासेवा फाऊंडेशनचे संदीप शुक्ला यांनी लोकमतला सांगितले. महिलेच्या प्रकरणाबद्दल येथे पोलिसांनी गंभीर होवून कारवाई करण्याची गरज आहे. मागील दहा दिवसापासून तपास सुरूच आहे. (तालुका प्रतिनिधी )

संबंधित व्यक्तीविरोधात ४९८ तथा ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-किशोर झोटींग, सहायक पोलीस निरीक्षक गोबरवाही.
या प्रकरणाची सविस्तर माहिती संबंधित गोबरवाही पोलीस ठाण्यातून घ्या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.

Web Title: Complaint against the woman's husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.