कागदपत्रे न देणाऱ्या शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार
By Admin | Updated: June 26, 2014 23:05 IST2014-06-26T23:05:01+5:302014-06-26T23:05:01+5:30
दोन विद्यार्थीनीच्या मुळ गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार देणाऱ्या एका खाजगी तंत्रशिक्षण विद्यालयाच्या विरोधात तुमसर पोलिसात तक्रार करण्यात आली. आ.अनिल बावनकर यांनी

कागदपत्रे न देणाऱ्या शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार
तुमसर : दोन विद्यार्थीनीच्या मुळ गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार देणाऱ्या एका खाजगी तंत्रशिक्षण विद्यालयाच्या विरोधात तुमसर पोलिसात तक्रार करण्यात आली. आ.अनिल बावनकर यांनी प्रमाणपत्रे देण्यास नकार देणाऱ्या तंत्रशिक्षण विद्यालयाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना भेटून तक्रार करणार आहेत.
तुमसर शहर व परिसरात मागील काही वर्षापासून खाजगी तंत्रशिक्षण विद्यालय व महाविद्यालयाचे उदंड पीक आले आहे. मोफत प्रवेश, शिष्यवृत्ती, शंभरटक्के रोजगार अशी आमिषे या महाविद्यालयाकडून दिली जातात.
खेड्यातील व सामान्य पालक याविद्यालयात विनामूल्य प्रवेश मिळतो म्हणून आपल्या पाल्यांना प्रवेश देतात. त्यानंतर त्यांचेकडून शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली वसुली केली जाते. असाच प्रकार शहरातील एका तंत्रशिक्षण विद्यालयात घडला. दोन गरीब विद्यार्थीनींनी या विद्यालयात प्रवेश घेतला. पुढे त्या विद्यालयात काही दिवस नियमित गेल्यानंतर त्यांनी आपली मूळ गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
मागितले, परंतु शाळा प्रशासनाने ते दिले नाही. शिक्षण शुल्क भरा त्यानंतरच तुम्हाला मुळ कागदपत्रे मिळतील, असे सांगितले. त्या विद्यार्थीनींनी आ.अनिल बावनकर यांचेकडे धाव घेतली. स्वत: आ.बावनकर त्या विद्यालयात विद्यार्थीनीसोबत गेले. शाळा व्यवस्थापनाच्या मुख्य संचालकांच्या आदेशानंतरच मुळ कागदपत्रे देण्यात येतील असे सांगितले.
आ.अनिल बावनकर यांनी त्या विद्यार्थीनींना तुमसर पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी तक्रार घेवून नागपूर येथील संचालकास पोलीस ठाण्यात येण्यासंबंधी आदेश दिला. संचालकांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर मुळ कागदपत्रे देण्याचे शाळा व्यवस्थापनाने कबूल केले. संचालकांनी तंत्रशिक्षण विद्यालयात नियमानुसारच शुल्क आकरला जातो, असे सांगितले. शहर व तालुक्यात उदंड पीक या तंत्रशिक्षणाचे आले असून या विद्यालयांना नियमानुसार मान्यता आहे काय, नोंदणीकृत आहेत काय, शुल्क किती घ्यावे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांचेकडे करणार असल्याचे आ.बावनकर यांनी लोकमतला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)