नगराध्यक्षांसह चार जणांविरुद्ध पोलिसात तक्रार
By Admin | Updated: August 5, 2014 23:19 IST2014-08-05T23:19:58+5:302014-08-05T23:19:58+5:30
नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व माजी नगरसेवकांनी महिलांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार सात

नगराध्यक्षांसह चार जणांविरुद्ध पोलिसात तक्रार
भंडारा : नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व माजी नगरसेवकांनी महिलांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार सात महिला सदस्यांनी भंडारा पोलिसात केली आहे. ही माहिती सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत तक्रारकर्त्या महिलांनी दिली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी संबधित तक्रारीवर कारवाई सुरु असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष बाबूराव बागडे, महेंद्र गडकरी, मकसुद बंसी व भगवान बावनकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणामुळे भंडाऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
पत्रपरिषदेला संध्या धनगर, आशा गायधने, ज्योती गणवीर, करुणा घोडमारे, शमीमा शेख, आशा उईके, चेतना हेडाऊ, धनराज साठवणे, विकास मदनकर आदी सदस्य उपस्थित होते. आशा गायधने म्हणाल्या, विशेष सभेत पालिका सदस्यासह एका माजी नगरसेवकाने महिला नगरसेवकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केली. यात करुणा घोडमारे यांच्या हाताला व पाठीला मार बसला. ज्योती गणवीर, संध्या धनकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असेही गायधने यांनी सांगितले. सभा सुरु होताच साठवणे गटातील महिला सदस्य या नगरसेविका किरण व्यवहारे, गीता सतदेवे यांच्याशी चर्चा करायला जात असताना बाबूराव बागडे, महेंद्र गडकरी, मकसुद बंसी व भगवान बावनकर यांनी महिला नगरसेवकांना धक्काबुक्की केली यात संध्या धनकर, करुणा घोडमारे व ज्योती गणवीर यांना दुखापत झाली. निवडणूक प्रक्रियेत आमची हजेरी म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. महिलांसोबत असभ्य वर्तणूक करणाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही महिला नगरसेवकांनी केली.
भगवान बावनकर नगरसेवक नसतानाही त्यांना आत प्रवेश कसा देण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. रात्री उशिरापर्यंत भंडारा पोलिस ठाण्यात कारवाई सुरु होती. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी याबाबत दुजोरा दिला. (प्रतिनिधी)