खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:18 IST2018-10-09T22:17:35+5:302018-10-09T22:18:11+5:30
सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गत महिन्याभरापासून पावसाने दडी मारली. शेतकरी संकटात सापडला आहे. प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. मात्र प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर येवुन आंदोलन करीत आहेत. अशा आंदोलक शेतकऱ्यांवर प्रशासन तात्काळ गुन्हे दाखल करते. मात्र प्रकल्प अधिकारी व तहसीलदार आंदोलनाच्या ठिकाणी लेखी आश्वासन देतात. जिल्हाधिकारी पाणी सोडण्याची घोषणा करतात. पंरतु दहा दिवसानंतरही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. खोटे आश्वासन देणाºयांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत कमलेश कनोजे, आनंद मलेवार, राजेश लेंडे यांनी वरठी ठाण्यात तक्रार दाखल केली.
लघु वितरिकेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वरठी, एकलारी, पाचगाव, मोहगाव, बोथली, पांजरा, सोनुली, नेरी या भागात पाणीच मिळाले नाही. महिन्याभरापासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहे. पाऊस नसल्याने चार हजार हेक्टरमधील धानपीक हातचे गेले आहे. प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशानाचे ठिसाळ नियोजन शेतकºयांना संकटाच्या घाईत उभे करीत आहे. अशा स्थितीत १ आॅक्टोबर रोजी वरठी येथील पाचगाव फाट्यावर आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकाºयांनी ५ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पण पाणी सोडले नाही उलट आंदोलकावर गुन्हे दाखल केले. आता शेतकºयांवर गुन्हे दाखल होत असेल तर अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल का करु नये, असा सवाल शेतकºयांनी केला आहे. वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यावेळी बोथलीचे माजी सरपंच कैलास तितीरमारे, मोहगाव माजी सरपंच राजेश लेंडे, ज्ञानीराम साखरवाडे, दिनकर लांबट, अनिल काळे आदी उपस्थित होते. पोलिसांनी प्रकरण तुर्तास चौकशीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एका पाण्याने हातचे गेले पीक
महिन्याभरापासून पावसाने दडी मारली. एका पाण्याने धानपिक हातचे गेले आहे. मोहाडी तालुक्यातील शेकडो हेक्टर धानपीक उध्दवस्त होत आहे. दुसरीकडे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असून हे पाणी नदीतून वाहत आहे. मात्र कालव्याद्वारे शेतकऱ्याच्या शेतात सोडले जात नाही. प्रकल्प अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन देते. मात्र शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आंदोलन करुनही पाणी सुटत नसल्याने आता नेमकी कोणती भुमिका घ्यावी अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आता पाणी सोडले तरी उत्पादनात घट हमखास होणार आहे.