जिल्हाधिकाऱ्यांची कंटेन्मेंट झोन, कोविड केअर सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:21+5:302021-04-09T04:37:21+5:30
गोंदिया : गोंदिया तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तालुक्यामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलेले ...

जिल्हाधिकाऱ्यांची कंटेन्मेंट झोन, कोविड केअर सेंटरला भेट
गोंदिया : गोंदिया तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तालुक्यामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलेले आहेत. कंटेन्मेंट झोनची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी गोंदिया नगर परिक्षेत्रांतर्गत असलेले गणेशनगर, रेल्वे कॉलनी येथील कंटेन्मेंट झोनची पाहणी केली व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसोबत चर्चा केली.
गोंदिया ग्रामीण येथील मौजा घिवारी येथील ४४ रुग्ण कोरोनाबाधित झाल्याने तेथे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देण्यात आली असून, तेथील नागरिक कोरोनाची तपासणी करण्यास नकार देत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील घरांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली. कोरोनाची तपासणी करण्याबाबत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले, तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू राहील याची दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले,
तसेच कंटेन्मेंट झोनमधील संशयित रुग्णांची कोविड तपासणी व लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत निर्देश दिले. कोविड केअर सेंटर पॉलिटेक्निक कॉलेज फुलचूर गोंदिया येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला व संबंधितांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले, तसेच जे नागरिक प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करीत नाही, अशा नागरिकांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.