जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पंचनाम्याचे निर्देश
By Admin | Updated: October 14, 2016 00:26 IST2016-10-14T00:26:03+5:302016-10-14T00:26:03+5:30
परतीच्या पावसाने धानपिक जमिनदोस्त झाले. यात शेकडो एकरातील धानपिकाला फटका बसला. मराठवाड्यात पंचनामाशिवाय भरघोस मदत देण्यात आली,

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पंचनाम्याचे निर्देश
शासनस्तरावरून सूचना नाही : प्रकरण धान पिकाच्या नुकसानीचे
भंडारा : परतीच्या पावसाने धानपिक जमिनदोस्त झाले. यात शेकडो एकरातील धानपिकाला फटका बसला. मराठवाड्यात पंचनामाशिवाय भरघोस मदत देण्यात आली, मात्र जिल्ह्याचे मुख्य पीक असतानाही व एवढी हानी झाल्यावरही राज्य शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले नाही. परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या हाकेला जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा देत धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात या चालू खरीप हंगामात पावणेदोन लक्ष हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय ४५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये अन्य पिकांची लागवड केली आहे. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे एकट्या धानपिक क्षेत्रातील २० टक्के क्षेत्र पडीत आहे. परिणामी धानपिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसामुळे हलक्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. तुमसर पासून तर लाखांदूर पर्यंत धानपिक अक्षरश: जमीनदोस्त झाले.
नुकसानीची आकडेवारी तालुकानिहाय सर्वेक्षणाअभावी हातात आली नसली तरी राज्य शासनाने पंचनामा करण्याचे कुठलेही निर्देश अजूनपर्यंत दिलेले नाहीत. परंतु या संदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात या संदर्भात गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी परतीच्या पावसामुळे धानपिकाच्या नुकसानीसंदर्भात पंचनामा करण्याचे तालुका प्रशासनाला निर्देश दिले आहेत. या संदर्भात सर्वेक्षण करून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला जाणार आहे. आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्याला या पंचनाम्याचा किंबहुना सर्वेक्षणाचा फायदा होणार काय? अर्थात योग्यरित्या सर्वेक्षण होणार काय? असे अनेक सवाल भविष्यात निर्माण होणार आहेत. (प्रतिनिधी)