जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांमध्ये खडाजंगी

By Admin | Updated: August 28, 2015 01:01 IST2015-08-28T01:01:49+5:302015-08-28T01:01:49+5:30

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना ‘युजलेस’, ‘नॉट काम्पिटंट’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...

Collector-Superintendent of Police | जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांमध्ये खडाजंगी

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांमध्ये खडाजंगी

एस.पी.नी म्हटले जिल्हाधिकाऱ्यांना गेटआऊट : आमदार, तहसीलदारांसमक्ष घडला प्रकार, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
भंडारा : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना ‘युजलेस’, ‘नॉट काम्पिटंट’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘गेट-आऊट’ म्हटले. जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या खडाजंगीमुळे प्रकरण तापले आहे. हा प्रकार आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, तहसीलदार नरेंद्र राचेलवार, सुशांत बनसोडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रताप धरमशी यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारला दुपारी घडला.
पवनी येथील तहसील कार्यालयात २५ आॅगस्ट रोजी तहसीलदारांची सभा सुरु असताना एका साप्ताहिकाचे संपादक व अन्य एकाने सभेत जाऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. दुपारी ३ ते ५.४५ वाजेपर्यंत या दोघांचा तहसील कार्यालयात धिंगाणा सुरुच होता. तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी याची माहिती संबंधित पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याला दिली. मात्र तब्बल तीन तासानंतर पोलीस तहसील कार्यालयात पोहचले. तहसीलदारांनी स्वत: तक्रार दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली.
सदर इसमाला जामीन मिळाल्यामुळे तो २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांच्या निवासस्थानी पोहचला. त्यावेळी तहसीलदार हे एकटेच होते. तुला जे काही बोलायचे आहे, ते कार्यालयात येऊन बोल, मी नक्की ऐकेल, असे राचेलवार यांनी त्याला बजावले. मात्र त्याने हुज्जत घातली. या प्रकारामुळे तहसीलदारांसह कर्मचारीही धास्तावले. त्यामुळे त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली. यासंबंधी गुरुवारी दुपारी १२ वाजता पवनीचे तहसीलदार राचेलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भेट घेतली. मागील दोन दिवसांत घडलेला वृत्तांत तहसीलदार राचेलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला.
भंडारा नगरपालिकेत कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्याच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जनतेची कामे करणारे अधिकारी व कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य जणांचे काय हाल होतील, असा सवाल उपस्थित करीत जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालावे, अशी एकमुखी मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना केली.
धास्तावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके हे बाहेर येऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पोलीस अधीक्षकांच्या कक्षात चर्चा चर्चा सुरु झाली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना घटना घडत असतानाही पोलीस वेळेवर कारवाई करीत नाही, असा प्रश्न जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विचारला. पोलीस अधीक्षकांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना ‘यु आर नॉट वर्क प्रॉपरली अ‍ॅण्ड युवर आॅफीसर नॉट टेकिंग अ‍ॅक्शन इमिजीएटली’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘गेट आऊट’ म्हणाले. यावेळी आमदार चरण वाघमारे व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खडाजंगीत आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही खडेबोल सुनावले. जिल्ह्याच्या वरिष्ठ व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आपण गेट आऊट म्हणत आहात, ही बाब योग्य नाही, असेही आमदार वाघमारे यांनी पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन गेले. तहसीलदार राचेलवार यांनी पुन्हा तक्रारी दिल्यास नक्की कारवाई करू, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक झळके यांनी दिली. (प्रतिनिधी)
महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद
पवनी तहसील कार्यालयात धुमाकूळ घालणाऱ्या साप्ताहिकाचे संपादक मनोहर मेश्राम व सुनिल उपरीकर याच्याविरुद्ध भादंवि ३८३, ३८४, ३८६, ४२७ कलमांतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही .या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यात तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटनेचा समावेश आहे. सदर साप्ताहिकाची नोंदणी रद्द करावी व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची अशी मागणीही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Collector-Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.