जिल्हाधिकाऱ्यांनी केली धान कापणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:59 IST2018-10-30T22:59:08+5:302018-10-30T22:59:25+5:30
जिल्हाधिकारी शेतात धान कापताहेत. सांगुनही कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र भंडाराच्या तरुण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क हातात विळा घेतला. एका शेतात पोहचले आणि चक्क धानाची कापणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे शेतकरी रुप पाहून उपस्थित अचंबित झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली धान कापणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हाधिकारी शेतात धान कापताहेत. सांगुनही कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र भंडाराच्या तरुण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क हातात विळा घेतला. एका शेतात पोहचले आणि चक्क धानाची कापणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे शेतकरी रुप पाहून उपस्थित अचंबित झाले.
जिल्ह्यातील धान शेतीची काय अवस्था आहे, याची पाहणी कृषी विभाग पीक पाहणीच्या प्रयोगातून केली जाते. महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग केला जातो. दरवर्षी कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करुन पीकाचा आढावा घेते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच खुद जिल्हाधिकारी या प्रयोगाला उपस्थित होते. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचा ताफा मंगळवारी मोहाडी तालुक्यातील निलज बुज. येथील पारबता अनतराम गाढवे यांच्या शेतात पोहचला. अर्धा एकर शेतात पारबताबाईने धानाची लागवड केली आहे. त्याच शेतात कृषी विभागाचा पीक कापणी प्रयोग सुरु होता. तेथे जिल्हाधिकारी पोहचले हातात विळा घेतला आणी प्रत्यक्ष धानाची कापणी केली. जिल्हाधिकारी धानाची कापणी करताना पाहून उपस्थित अधिकारी आणि शेतकरीही अचंबित झाले. अर्धा एकरातील दहा बाय दहाच्या प्लॉटवरील धान कापणी करुन प्रयोग करण्यात आला. तणसाबरोबर धानाचे वजन प्रथम करण्यात आले. त्यानंतर धानाची काढणी झाली. त्यातून निर्माण झालेले धान जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी व शेतकºयांच्या समक्ष मोजण्यात आले. या पीक कापणी प्रयोगात सरासरी हेक्टरी ३६ क्विंटल धान उत्पादन झाले. त्याद्वारे २३ क्विंटल तांदळाचे उत्पादन होईल. असा अंदाज काढण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे संचालक अरुण बलसाने, तंत्र अधिकारी मनिषा थोटे, तालुका कृषी अधिकारी रामटेके उपस्थित होते.
एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने प्रत्यक्ष शेतात जावून पीक कापणी करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. अधिकारी म्हटले की, सर्वसामान्यापासून फटकून वागणारे असाच समज असतो. पंरतु यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या प्रयोगाने जिल्हाधिकाऱ्यांचे नविन रुप जिल्ह्याला अनुभवायला मिळाले.
३४ मंडळात प्रयोग
कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक महसूल मंडळात १२ पीक कापणी प्रयोग करण्यात येतात. जिल्ह्यात हा प्रयोग ३४ मंडळात सुरु आहे. या प्रयोगातून जिल्ह्याच्या धान उत्पादनाची सरासरी काढण्यात येते. मंगळवारी हा प्रयोग जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.