विद्यापीठ परीक्षेत ‘सामूहिक कॉपी’
By Admin | Updated: May 14, 2015 00:31 IST2015-05-14T00:31:14+5:302015-05-14T00:31:14+5:30
दहावी, बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. परंतु, भंडारा शहरातील प्रगती महाविद्यालयाच्या परीक्षा ...

विद्यापीठ परीक्षेत ‘सामूहिक कॉपी’
प्रगती महाविद्यालयातील प्रकार केंद्र संयोजक व कर्मचाऱ्यांची धावपळ परीक्षार्थी घेऊन बसले गाईड
प्रशांत देसाई भंडारा
दहावी, बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. परंतु, भंडारा शहरातील प्रगती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी सुरू असल्याचा लाजीरवाणा प्रकार बुधवार उघडकीस आला आहे.
नागपूर महामार्गावरील प्रगती महिला महाविद्यालयात नागपूर व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी - २०१५ च्या परीक्षा सुरू आहेत. या महाविद्यालयात परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था केवळ २५० विद्यार्थ्यांची आहे. असे असतानाही या परीक्षा केंद्रावर एका बाकावर तीन-तीन विद्यार्थी बसविण्यात आले आहे. यामुळे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षार्थींना बैठक व्यवस्था अपूरी पडल्याने पहिल्या दिवशी रखरखत्या उन्हात ६० विद्यार्थ्यांना घाम पुसत पेंडालमध्ये परीक्षा द्यावी लागली होती. याबाबत ‘लोकमत’ने दि. ९ मेच्या अंकात ‘विद्यार्थ्यांनी दिली पेंडालमध्ये परीक्षा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता.
आज बुधवारला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी सुरू असल्याची माहिती सदर प्रतिनिधीला मिळताच महाविद्यालय परिसरात फेरफटका मारला असता, केंद्रावर सामूहिक कॉपी सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयाच्या दुसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान वर्गातील परीक्षार्थी सामूहिक कॉपी तर काही विद्यार्थी चक्क गाईडमधून उत्तर सोडविताना आढळून आले. हा प्रकार कॅमेरात टिपत असताना महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क केले. खुल्या असलेल्या खिडक्या बंद करण्यासाठी वर्गातील शिक्षकांची धावपळ सुरू झाली.
बुधवारला या परीक्षा केंद्रावर नागपूर विद्यापीठाचा एमए मराठी व समाजशास्त्र तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बीए प्रथम वर्षाचा पेपर होता. या परीक्षा केंद्रावर बीई, एमएससी, बीकॉमच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे.
दि. ९ मे रोजी या परीक्षा केंद्रातील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतरही पुन्हा तसाच प्रकार कायम आहे. परीक्षा केंद्राच्या मागील भागात विद्यार्थ्यांनी फेकलेल्या कॉपीचा खच आढळून आला. ही बाब लक्षात येताच महाविद्यालय प्रशासनाने तो गोळा करून जाळला. विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून सामूहिक कॉपीला प्रोत्साहन देण्याचा गंभीर प्रकार प्रगती महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर उघडकीस आल्याने येथील परीक्षा केंद्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कॅमेरामुळे परीक्षा केंद्रावर धावपळ
सदर प्रतिनिधीने परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार कॅमेराबद्ध करीत असल्याचे लक्षात येताच वर्ग शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व केंद्र संयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी केंद्रातील प्रसाधनगृहात ठेवलेला कॉपीचा पुळका काढून एका प्लॉस्टिकच्या पिशवीत कोंबून नेला. शिक्षकाने वर्गाच्या खिडक्या पटापट बंद केल्या. हा प्रकार कॅमेराबद्ध करताना महिला कर्मचारी व केंद्र संयोजक आले. मात्र, कॅमेरा दिसताच तोंड लपवून निघून गेले.
कर्मचाऱ्याचा आतताईपणा
सामूहिक कॉपीचा प्रकार कॅमेरात टिपत असताना, आकाशी रंगाचा शर्ट परिधान केलेला एक कर्मचारी आला व त्याने कॅमेरात छापा, जे वाटेल ते छापा असे ओरडत होता. तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाही, अशाच अर्विभावात त्याचे वर्तन होते.
दुसऱ्या माळ्यावर मुक्त विद्यापीठाची परीक्षा सुरू होती. या अभ्यासकेंद्राचे विद्यार्थी वर्षभर येत नाही. सामूहिक कॉपी होऊ नये, यासाठी एका वर्गावर तीन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी करू शकत नाही. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्यांनी काही केल्यास सूट द्यावी लागते.
- प्रा. डी. डी. चौधरी
केंद्र संयोजक, प्रगती महिला महाविद्यालय, भंडारा.