पांजऱ्यात अतिवृष्टीने घरांची पडझड
By Admin | Updated: September 2, 2015 00:29 IST2015-09-02T00:29:42+5:302015-09-02T00:29:42+5:30
करडी परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने पांजरा गावातील इसन नका मेश्राम (७५) यांचे राहते घर जमीनदोस्त झाले.

पांजऱ्यात अतिवृष्टीने घरांची पडझड
लाखोंचे नुकसान : घरकूल देण्याची मागणी
करडी (पालोरा) : करडी परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने पांजरा गावातील इसन नका मेश्राम (७५) यांचे राहते घर जमीनदोस्त झाले. अनुसया रामचंद्र पचघरे (६५) यांच्या घराची भिंत कोसळली तर शाम राऊत यांचा गुराचा गोठा भुईसपाट झाला. लाखो रुपयांचे नुकसान अतिवृष्टीने झाले असून घरकुलाची मागणी होत आहे.
परिसरात काल ४ ते ५.३० वाजताचे सुमारास वादळासह अतिवृष्टी झाली. जोरदार पावसाच्या मुसंडीने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. अतिवृष्टीने माताीच्या घराचे मोठे नुकसान झाले. पांजरा (बोरी) गावातील इसन नका मेश्राम यांचे घर कोसळल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. राहण्यासाठी त्यांचेकडे कोणताही पर्याय नाही. घरकुल तत्काळ मंजूर करुन नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.
पांजरा येथील अनसूया रामचंद्र पचघरे यांच्या घराची भिंत कोसळून दिड लाख रुपये किंमतीच्या घराचे नुकसान झाले तर शाम राऊत यांचा गुराचा गोठा जमीनदोस्त झाला. त्वरित नुकसान भरपाई व घरकुल मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गौरीशंकर राऊत, ज्योती पचघरे, रामेश्वर तितिरमारे, भगवान घोनमोडे, किरण शहारे, किशोर मेश्राम, किशोर मानकर, जयदेव राऊत यांनी केली आहे.
प्रकरणी तलाठी जांभोरा यांना माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला. नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना पांजरा प्रकरणी कळविले आहे. नुकसान भरपाई व घरकुलासंबंधी निर्णय घेतला जाईल. जि.प. मधून मदतीसाठी प्रयत्न केले जातील.
- सरिता चौरागडे,
जि.प. सदस्या बेटाळा