सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री मित्र योजना
By Admin | Updated: May 17, 2016 00:16 IST2016-05-17T00:16:42+5:302016-05-17T00:16:42+5:30
सर्वसामान्यांचा समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री मित्र ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.

सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री मित्र योजना
पत्रपरिषद : भाजप प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांची माहिती
भंडारा : सर्वसामान्यांचा समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री मित्र ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून १५ नागरिकांची मुख्यमंत्री मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपच्या प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, भाजपच्या ध्येयधोरणानुसार प्रत्येक योजनांचा लाभ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेला नेहमी प्रत्येक बाबतीत काहीना काही अडचणींना तोंड द्यावे लागते. अशावेळी त्यांच्या समस्यांमध्ये वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री मित्र दुवा ठरणार आहे. नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी ही योजना आहे. जिल्हानिहाय १५ व्यक्तींची मुख्यमंत्री मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. राज्यातून यासाठी २,८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री मित्रमध्ये युवक, माजी सरकारी अघिकारी, माजी सैैनिक, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, वकील आदींचा समावेश असेल. तहसील कार्यालय, शासकीय रूग्णालय, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदी शासकीय कार्यालयांमार्फतच्या योजना, जनतेची दैनंदिन कामे योग्य पध्दतीने चालतात का याचा आढावा हे मुख्यमंत्री मित्र वेळोवेळी घेतील. सर्व शासकीय कार्यालयांचे सोशल आॅडिट होईल, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला आमदार चरण वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटले, प्रकाश मालगावे, नितीन दुरगकर, आशु गोंडाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)