क्लबफूट आजारावर होणार रुग्णालयात उपचार

By Admin | Updated: June 4, 2015 00:30 IST2015-06-04T00:30:57+5:302015-06-04T00:30:57+5:30

रत्येक आई वडिलांना आपले बाळ सुदृढ निरोगी आणि गुटगुटीत जन्माला यावे, अशी इच्छा असते.

The clubfoot treatment will be done in the hospital | क्लबफूट आजारावर होणार रुग्णालयात उपचार

क्लबफूट आजारावर होणार रुग्णालयात उपचार

नि:शुल्क मिळणार सेवा : महाराष्ट्रात ३ हजार ७०० पेक्षा अधिक मुले आजारी
भंडारा : प्रत्येक आई वडिलांना आपले बाळ सुदृढ निरोगी आणि गुटगुटीत जन्माला यावे, अशी इच्छा असते. काही दाम्पत्यास सुदृढ बाळ होत नाही. कधी कधी गर्भारपणातील काही त्रुटींमुळे जन्माला येणारे बाळ जन्मताच काही विकृती घेऊन येते. ज्यामुळे ते बाळ आई वडिलांवर कायमचे विसंबून राहण्याची शक्यता निर्माण होते. जन्मजात आजारांपैकी तळपावलांचा वाकडेपणा (क्लबफुट) हा एक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध आहेत.
यामध्ये बाळाचे पाऊल आतील दिशेने वाकडे असते. ज्यामुळे मुलांना उभे राहणे व चालणे शक्य होत नाही. यावर वेळीच उपचार न केल्यास मुलं कायमचे अंपग बनून राहते. भारतात दरवर्षी ५० हजार मुले या आजारासहित जन्माला येतात. महाराष्ट्रात ३ हजार ७०० पेक्षा अधिक मुले क्लबफुट ही विकृती घेऊन जन्मतात. अनेकदा या मुलांना पोलिओ असल्याचा गैरसमज असतो. या विकृतीवर वेळीच योग्य उपचार न केल्यास बहुतांश मुले क्लबफुट ही विकृती घेऊनच मोठी होतात. आयुष्यभर शारीरिकदृष्टया अपंग म्हणून जीवन जगण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नसतो. क्लबफुटवर बालपणी उपचार न केल्यास या मुलांना चालणे, खेळणे आणि धावणे या क्रिया करणे शक्य होत नाही. अनेक जण तर शिक्षणापासून वंचित राहतात.
हा आजार पुर्णत: बरा होऊ शकतो. त्यासाठी सलग प्लास्टर बांधून ठेवणे आणि विशेष बुट वापरणे हा उपचार आहे. क्लबफुटच्या उपचारासाठी संपर्क जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिविभागात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र क्युअर क्लबफुट सहाय्यता केंद्र ९९२२३0३८0२ यावर संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

'टिनोटॉमी' म्हणजे काय ?
बऱ्याच मुलांना शेवटच्या प्लास्टरपुर्वी टिनोटॉमी या उपचाराची गरज असते. यामध्ये टाचेतील वाकडी शिर कापण्यात येते. त्यानंतर बाळाला लगेच नवीन प्लास्टर लावले जाते. बाळाला टिनोटॉमीची गरज आहे किंवा नाही ? हे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ठरवावे. शेवटचे प्लास्टर तीन आठवडे ठेवावे लागते. प्लास्टर काढल्यानंतर बाळाला विशेष बुट दिले जातात.
विशेष बुटची गरज काय ?
पॉन्सेटी उपचार पद्धतीने श्रेणीबद्ध प्लास्टर करून पायाला सरळ केल्यानंतरही बाळाचे पाय पुन्हा वाकडे होण्याचा धोका असतो. हे होऊ नये म्हणून शेवटच्या प्लास्टर नंतर विशेष बुट वापरणे बाळासाठी खूप महत्वाचे ठरते. सुरुवातीचे तीन महिने २३ तास बुट बाळाच्या पायात ठेवावे लागतात. त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी चार वर्षापर्यंत बुट बाळाला झोपण्याच्या वेळी घालावे लागतात. मुलं जसजसे मोठे होत जाईल तसे त्याचे पाय सरळ होत जातात.
या सर्व उपचाराला किती खर्च येतो ?
हा संपूर्ण उपचार पूर्णपणे नि:शुल्क असून असे मुलं असणाऱ्या पालकांनी बाळाला वेळीच डॉक्टरांना दाखवावे. या उपचारामध्ये आई-वडिलांचे सहकार्य खुपच महत्वाचे आहे. यासाठी बाळाचे प्लास्टर बदलण्यासाठी दर आठवड्याला डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. त्यासाठी वेळ काढणे आणि बाळाला समजून घेऊन प्रोत्साहन, प्रेम व आपुलकीची गरज असते.

Web Title: The clubfoot treatment will be done in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.