ढग जमतात, पण पाऊस पडतच नाही
By Admin | Updated: August 12, 2015 00:27 IST2015-08-12T00:27:55+5:302015-08-12T00:27:55+5:30
आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल, अशी आस मनात तयार होते.

ढग जमतात, पण पाऊस पडतच नाही
मुखरु बागडे पालांदूर
आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल, अशी आस मनात तयार होते. ढगांना पोहणं मिळते आणि बघता बघता ढग पुढे पुढे सरकतच जातात. मनातली अभिलाशा मनातच विरते. पाऊस मोहफुल पडल्यावानी पडतो आणि आकाश निरभ्र होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित पाऊस पडतच नसल्याने जिल्हाभर दृष्काळाचे संकेत मिळत आहे.
बळीराजाच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. चालूची रोवणी खोळंबली असून झालेली रोवणी सुकत आहे. भंडारा जिल्ह्यातील मजुर अधिक मजुरी मिळत असल्याने परजिल्ह्यात स्थलांतरीत होत आहे. सिंचनाखालील रोवणीला असलेला तणाच्या निंदणाला मजुर नाही. महागाई डोईजड होत आहे. जगाचा पोशिंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे नादार होत असून त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. शासन, लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने कर्जासाठी व्यापाऱ्याकडून अगाऊ पैसे घेऊन उद्या येणारे पीक आजच अल्पदरात विकत आहे. त्याच बळीराजाचे धान, त्याचाच सातबारा हमीभाव केंद्रात देवून व्यापारी मालामाल तर शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
जिल्ह्यात पेरणी व रोवणीने बळीराजा मेटाकुटीस आला असतानाच पालांदूर परिसरात मंडळ कृषी व महसूल सर्वेनुसार केवळ ६० टक्के रोवणी पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केला आहे. आॅगस्टच्या १० तारखेपर्यंत ५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावरून दृष्काळाची भयावह स्थिती दिसत आहे. मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके यांनी दिलेल्या सर्वेनुसार १,१८४.४५ क्षेत्रापैकी प्रत्यक्षात रोवणी ७,६३२, आवत्या १,२८६ हेक्टर, नर्सरी पऱ्हे ९,३९.४४ , तुर ७४०.७५, हळद २०.६५, ऊस १९.९०, केळी ९.२०, भाजीपाला ३१.३० इतर ५१.८० हेक्टर वर पेरणी आटोपली आहे. मंडळ अधिकारी पालांदूरच्या सर्वेनुसार पालांदूर किटाडी, ईसापूर, खराशी, गुरठा, हलक्या अंतर्गत पेरणी १०० टक्के झाली असून रोवणी मात्र ६० टक्के पुर्ण झाली आहेत.
मागील तीन वर्षाचा दुष्काळ डोक्यावर असताना यंदाही दुष्काळ दिसत असल्याने बळीराजा मनात खचला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून स्विकारलेला दुग्ध व्यवसाय रसातळाला जात आहे. शासानाचे २० रूपये दराने खरेदी करण्याचे वचन धुळीला मिळवत पालांदुरात १३ ते १४ रूपये लीटरने दुध खरेदी होत आहे. खुराकीचे दर वाढत आहेत तर दुधाचे दर कमी होत आहेत. पिकविमा मिळाला पण तोही विमा हप्त्याच्या कमीच.
चालूवर्षीचा विमा सुद्धा उंबरठा उत्पादनावर आधारित असल्याचे कृत्रिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. याचा अर्थ शेतकरी याहीवर्षी पिकविम्याला मुकणार हे निश्चित दिसत आहे. यावर्षी बळीराजा पुरता आर्थिक संकटात सापडला असून असून निसर्गासह शासनानेही त्याच्याकडे पाठ फिरविली आहे.
धानपीक संकटात
पवनी : पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर करुन भातशेती केल्या जात आहे. शेती पडीत ठेवण्यापेक्षा शेतीचा उपयोग करणे.
पवनी तालुक्यालाच नव्हे तर, भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी हरितक्रांती ठरू पाहणारे गोसेखुर्द धरण पवनी तालुक्यात आहे. मात्र गोसेखुर्दचा उजवा कालवा येथून सोडण्यात आला असला तरी त्याचा लघु कालवा नसल्याने धानोली परिसरातील सुमारे ७५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर सिंचनाच्या सोयीअभावी निसर्गावर अवलंबून राहून शेती करावी लागते आहे. (तालुका प्रतिनिधी)