केंद्र शासनाच्या आदेशानेच धान खरेदी बंद
By Admin | Updated: May 30, 2014 23:26 IST2014-05-30T23:26:56+5:302014-05-30T23:26:56+5:30
शेतकर्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी ३0 जूनपर्यंत सुरु राहणारे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ मे रोजीच बंद केल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनावर खापर फोडले जात असले तरीही योजना केंद्र

केंद्र शासनाच्या आदेशानेच धान खरेदी बंद
धान खरेदी केंद्र : अनिल बावनकर यांचा आरोप
भंडारा : शेतकर्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी ३0 जूनपर्यंत सुरु राहणारे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ मे रोजीच बंद केल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनावर खापर फोडले जात असले तरीही योजना केंद्र सरकारची असून केंद्राच्या आदेशानेच धान खरेदी बंद झाली आहे, असा आरोप आ.अनिल बावनकर यांनी पत्रपरिषदेत केला.
३0 जूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश असताना १५ मे रोजी केंद्र बंद करून राज्य सरकार शेतकर्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप खा.नाना पटोले यांनी केला होता. याबाबची वस्तूस्थिती स्पष्ट करताना आ.बावनकर म्हणाले, आधारभूत खरेदी केंद्राची योजना केंद्र सरकारची असून, खरीप हंगामापूर्वीच केंद्राकडून आदेश जारी केले जातात. मागीलवर्षीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात केवळ खरीपाच्या हंगामातील धान खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर २0१३ ते फेब्रुवारी २0१४ या काळातच खरेदी केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. तथापि, शेतकर्यांचे हीत, लोकसभा निवडणूक आणि राजकीय पुढार्यांचा दबाव लक्षात घेता ३0 जूनपर्यंत खरेदी केंद्र पुढे चालविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाचे उत्पादन होत असून पूर्वी रब्बीचे धान होत नसल्याने केंद्र शासनाकडून या काळात खरेदी केंद्रायाची योजना राबविली जात नव्हती. मागील काही वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण होऊन पाण्याची सोय झाल्याने शेतकरी रब्बी आणि उन्हाळी धानाचे उत्पादन घेतात.
महाराष्ट्रात रबी हंगामात धान खरेदी केंद्राची योजना नसतानही केवळ शेतकर्यांच्या हितासाठी राज्य शासनाने ही योजना पुढे चालविली, असेही त्यांनी सांगितले. केंद्र मध्येच बंद केल्याचा कांगावा करीत राज्य शासनावर खापर फोडण्यापेक्षा खरेदी केंद्र पुढे सुरु ठेवण्यासाठी खा.पटोले यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. धान खरेदी केंद्र बंद झाल्याने क्विंटलमागे ५00 रुपये कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत, परिणामी शेतकर्यांचे नुकसान होत आहे, असे सांगत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याबाबत २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचेही आ.बावनकर यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)