मुलींच्या सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे ‘आई’
By Admin | Updated: February 21, 2017 00:24 IST2017-02-21T00:24:12+5:302017-02-21T00:24:12+5:30
मुलींना प्रथमत: उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवावे. शिक्षणात जास्त लक्ष घालावे.

मुलींच्या सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे ‘आई’
बेटी बचाव उत्सव : अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मत
भंडारा : मुलींना प्रथमत: उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवावे. शिक्षणात जास्त लक्ष घालावे. आई वडीलांच्या स्वप्नाला आकार द्यावा. जीवन उध्वस्त होईल असे कोणतेही कृत्य करू नका. मुलींनी आपल्या अडचणी, समस्या, शंका यांचे निरसन करण्यासाठी सर्वात आधी आईशी संवाद करावा. आईला आपली प्रथम मैत्रीण मानून मनातील बाबी व्यक्त कराव्या, असा प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी व्यक्त केले.
शिक्षण विभाग पंचायत समिती भंडाराच्या मीना राजू मंच अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ तालुकास्तरीय संकल्प उत्सव जकातदार कन्या विद्यालय भंडारा येथे घेण्यात आला. बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प उत्सवाचे उद्घाटनप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मृणाल मुनीश्वर होत्या. अतिथी म्हणून विशाखा गुप्ते, जयश्री सावरकर, गटशिक्षणाधिकारी तिडके, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, जकातदार कन्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक हटवार, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल बांडेबुचे, सरादे यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व शारदा स्तवनाने उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकातून शंकर राठोड यांनी शासनाचा बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश घराघरात पोहचला पाहिजे. मुलींचा जन्मदर ही चिंतेची बाब आहे. त्यावर जनजागृती करण्यासाठी संकल्प उत्सवाचा उद्देश असल्याचे सांगितले. जागर लेक रक्षणाचा या विषयावर नूतन कन्या शाळा भंडाराच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. भ्रूणहत्येवर लघुनाटीका पहेलाच्या गांधी विद्यालयाने सादर केली. यावेळी मार्गदर्शन करताना मृणाल मुनीश्वर, मुलींच्या मनातील भीती घालविणे ही पालकांची जबाबदारी आहे. गुरुजनांचा आदर करा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका, कौटुंबिक तणावाचे परिणाम मुलींवर होवू देऊ नका, मुलींच्या कौशल्याला वाव द्या अशी भावनिक साद त्यांनी घातली. विशाखा गुप्ते यांनी वंशाला दिवा पाहिजे असा पालकांनी अट्टाहास करू नये.
पालकांनी मुलींना स्वबळावर उभी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शिक्षकांची व्याख्या करून मुलींना उच्च शिक्षणाची भरारी मारू द्या, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करा असे सांगितले. डॉ.स्नेहल बांडेबुचे यांनी किशोरवयात मुलींना होणारे आजार व त्यावर उपाय यावर मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वय जयश्री सावरकर यांनी जन्माआधी माझ्यावर चालवू नका सुरी ही कविता सादर करून मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती नागलवाडे, विलास चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन जकातदार कन्या विद्यालयाच्या शिक्षिका चोले यांनी केले. कार्यक्रमाला संजय आजबले, दिनेश खोब्रागडे, संजय माने, राम वाडीभस्मे, अरुण झुरमुरे, भोपे, रामटेके, बेदरकर, भेंडारकर, सरादे, हटवार तसेच आठवले कॉलेज व जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)