२०० शेतकऱ्यांचा रहदारीचा मार्ग होणार पावसाळ्यात बंद
By Admin | Updated: June 25, 2017 00:17 IST2017-06-25T00:17:00+5:302017-06-25T00:17:00+5:30
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत देव्हाडी शिवारात नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली.

२०० शेतकऱ्यांचा रहदारीचा मार्ग होणार पावसाळ्यात बंद
आंदोलनाचा इशारा : खोलीकरणामुळे रस्ता बनला धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत देव्हाडी शिवारात नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली. देव्हाडी-चारगाव शिवारात नाला खोलीकरण दरम्यान शेतावर जाणारा रपटा धोकादायक बनला. यामुळे २०० शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतावर जाता येणार नाही. नाला खोलीकरणादरम्यान माती शेतात टाकण्यात आली. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत ही कामे करण्यात आली.
देव्हाडी येथील शेतकरी दिलीप बिरणवारे, विजय वाट, परसराम बिरणवारे, राधेलाल बिरणवारे, भास्कर बिरणवारे यांनी तक्रार केली आहे. यापैकी दिलीप बिरणवारे व विजय वाट यांनी स्वत:चे पैसे खर्च करून माती हटविली. हा खर्च देण्याची हमी देण्यात आली, परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी खर्च केलेले पैसे दिलेले नाही.
देव्हाडी शिवारात चारगावकडे जाणाऱ्या पांदन रस्ता आहे. या रस्त्यावर शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी एक रपटा होता. रपट्याजवळ नाला खोलीकरण केल्याने या रपट्याने मार्गक्रमण करणे पावसाळ्यात धोकदायक ठरणार आहे. पायीसुद्धा येथे जाता येणार नाही. बैलबंडी, ट्रॅक्टर घेऊन जाता येणे शक्य नाही. संबंधित विभागाच्या अभियंते व कंत्राटदारांना विनंती केल्यावरही याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा असे ब्रीद असताना येथे केवळ पैसा जिरविण्याचेच कामे सुरू असल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय तुमसरात नाही. भंडारा येथूनच यावर नियंत्रण केले जात होते. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत कामे नियमानुसार तथा गुणवत्तापूर्वक करावी, असे आदेश राज्य शासनाचे आहेत, परंतु प्रत्यक्ष कामावर तसे दिसून येत नाही.
तक्रारकर्ते शेतकऱ्यांची समस्या तीन दिवसात दूर करण्यात येईल. शेतातील माती तात्काळ काढण्याचे आदेश देणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा खर्च नक्की मिळेल. रपट्यावर मातीचा भराव घालण्यात येईल.
- पी. धुर्वे, शाखा अभियंता,
लघु पाटबंधारे विभाग तुमसर.