रेतीचे अवैध उत्खनन बंद करा

By Admin | Updated: October 18, 2014 22:59 IST2014-10-18T22:59:45+5:302014-10-18T22:59:45+5:30

जिल्हा प्रशासनाने रेतीचे अवैध उत्खननप्रकरणी सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी, बेटाळानजीकच्या वैनगंगा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याचा थेट फटका रस्ता तसेच

Close the illegal excavation of the sand | रेतीचे अवैध उत्खनन बंद करा

रेतीचे अवैध उत्खनन बंद करा

भंडारा : जिल्हा प्रशासनाने रेतीचे अवैध उत्खननप्रकरणी सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी, बेटाळानजीकच्या वैनगंगा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याचा थेट फटका रस्ता तसेच धानपिकाला बसत आहे. रेतीचे अवैध उत्खनन बंद करण्याची मागणी बेटाळा येथील मुरलीधर शेंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बेटाळा गावालगत वैनगंगा नदीच्या पात्रातील रेतीचा उपसा जोमात सुरू असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. त्या रस्त्याने दिवस-रात्र १५० ट्रॅक्टर जवळपास १०० ट्रक व दोन जेसीबी जात असतात. रहदारीच्या रस्त्याने बैलबंडी व पायदळ जाणाऱ्यांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये धानपिक उभे आहे. या पिकांवर रस्त्यावरची धूळ बसत आहे. परिणामी पिकाची हानी होत आहे.
रेतीच्या प्रचंड उपसामुळे विहिरीची पातळी खालावली आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. रेतीघाटाच्या रॉयल्टीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. परंतु रेतीचा उपसा अद्यापही निरंतर सुरू आहे. शेतकऱ्यांनी रेतीची वाहतूक होवू नये यासाठी ट्रक अडविले असता त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.
यासंबंधी अनेकदा पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आली. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, खनिकर्म विभागाचे मुख्य आयुक्त, उपविभागीय अधिकारी तुमसर यांना दिले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Close the illegal excavation of the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.