लग्नपत्रिकेतून दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 00:24 IST2017-05-11T00:24:14+5:302017-05-11T00:24:14+5:30
साधारणत: लग्नाची निमंत्रण पत्रिका म्हणजे लग्न कुणाचे? कुठे? आणि केव्हा याविषयी माहिती देणारा एक कागद.

लग्नपत्रिकेतून दिला स्वच्छतेचा संदेश
राष्ट्रीय कार्यास हातभार : महादेव डोये यांचा स्तुत्य उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बुज) : साधारणत: लग्नाची निमंत्रण पत्रिका म्हणजे लग्न कुणाचे? कुठे? आणि केव्हा याविषयी माहिती देणारा एक कागद. मात्र सावरटोला / बोरगाव येथील महादेव डोये यांनी मुलाच्या लग्न पत्रिकेतून सार्वजनिक स्वच्छता, वृक्षसंवर्धन, पाण्याचे जतन, मतदान, स्त्री भ्रूणहत्या याविषयी संदेश देऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावला आहे.
महादेव डोये यांचा मुलगा गजानन यांचा विवाह हरदोली येथील दयाराम मटाले यांची मुलगी निशा हिच्याशी ११ मे ला सायंकाळी होत आहे. या विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिकेत स्वच्छ भार त अभियानाच्या लोगोमध्ये (महात्मा गांधीजींचा चष्मा) वरवधूंची नावे असून एक पाऊल स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा संदेश दिला आहे. या चार पाणी लग्न पत्रिकेत पहिले पान वगळून इतर तीन पानांवर टॉप टू बॉटमला राष्ट्रीय कार्याविषयी संदेश दिलेले आहे. एका पानावर पाण्याचे जतन आणि वृक्षसंवर्धन, दुसऱ्या पानावर मुल्यशिक्षण व पर्यावरण रक्षण आणि मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण करणारे संदेश तर तिसऱ्या पानावर राजमाता जिजाऊ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबांच्या छायाचित्रांसह स्त्री भ्रूणहत्या व लग्न समारंभाविषयी या थोरपुरूषांची अमृतवचने प्रकाशित करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला आहे.