स्वच्छता अभियानाची लागली वाट
By Admin | Updated: September 21, 2014 23:46 IST2014-09-21T23:46:35+5:302014-09-21T23:46:35+5:30
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छतेतून समृध्दीकडे असा मंत्र देत मोठा गाजावाजा करुन ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले. मात्र आता

स्वच्छता अभियानाची लागली वाट
भंडारा : महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छतेतून समृध्दीकडे असा मंत्र देत मोठा गाजावाजा करुन ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले. मात्र आता अभियानाला उतरती कळा लागली असून यापूर्वी हागणदारीमुक्त झालेली गावेही आता पूर्वपदावर परत येत आहे.
या स्वच्छता अभियानाच्या प्रारंभीक काळात निवडक गावे हागणदारीमुक्त झाली होती. तथापि लोक सहभागाअभावी या योजनेचे ग्रामीण व शहरी भागात आता तिनतेरा वाजले असून बहुतांश हागणदारीमुक्त गावे पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अनेक मार्ग विष्ठेने व्यापलेले असतात. आडमार्ग घाणीने भरलेले असतात. ठिकठिकाणी उकीरडे साचलेले असतात. पावसाच्या दिवसात तर संपूर्ण गावे घाणीने वेढलेली असतात. परिणामी विष्ठेच्या संपर्काने किंवा वाहनांची चाके, चपला-जोडे यांच्याद्वारे होणाऱ्या प्रसाराने रोगांचा गावात प्रसार होतो. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून राबविता येणारे स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले होते.
हे स्वच्छता अभियान पुढे जाऊन उत्स्फूर्त लोकचळवळीत परावर्तीत होऊन स्वच्छ, सुंदर, निरोगी परिसराची सवय सर्वांना व्हावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पंरतु आजपर्यंत राबविल्या गेलेल्या अभियानाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास या उद्देशाचीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानाचीच वाट लागल्याचे विदारक वास्तव अनुभवायला येत आहे. केवळ जयंती, पुण्यतिथी या कार्यक्रमापुरते व छायाचित्र घेऊन फुशारकी मारण्यापुरतेच स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आजही अनेक गावातील पोलिस पाटील, सरपंच, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी उघड्यावर शौचास जाताना दिसून येत आहे.
वैयक्तिक स्वच्छतेपासून घर, परिसर आणि संपूर्ण ग्रामस्वच्छतेची संपूर्ण प्रक्रिया केवळ शासकीय खटाटोपाचा एक भाग झाली आहे. शासनाने ठेवलेले बक्षीस पटकावण्याची एक औपचारिक स्पर्धा असल्याचे स्वरुप, या अभियानाला येऊ लागले आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी जनमानसात रुजलेल्या अंधश्रध्दांचा पगडा दूर सारुन स्वत:च्या कृतीतून कर्मयोगाचे बाजीरोपण केले. हातात झाडू घेऊन गल्लीबोळातील रस्ते झाडताना मनामनातील अज्ञान, अंधश्रध्देचे जाळे साफ करण्याचे कार्य त्यानी केले. परिसर स्वच्छतेच्या पर्यायाने निरामय जीवनाचा मूलमंत्र त्यांनी कृतीतून रुजविला.
स्वच्छतेअभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असताना ते स्वच्छ करण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची असल्याची वृत्ती आता नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे. परिणामी स्वच्छतेच्या समस्येने ग्रामीण भागात आता विक्राळ रुप धारण केले आहे. लोकसहभागाअभावी स्वच्छता अभियानाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)