वारपिंडकेपारात वर्ग चार, शिक्षक एक
By Admin | Updated: October 20, 2015 00:45 IST2015-10-20T00:45:02+5:302015-10-20T00:45:02+5:30
बावनथडी नदी काठावर असलेल्या वारपिंडकेपार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चार तुकड्यांना एक शिक्षक सांभाळत आहे.

वारपिंडकेपारात वर्ग चार, शिक्षक एक
शिक्षणाचा बोजवारा : माजी खासदारांचे गाव
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी काठावर असलेल्या वारपिंडकेपार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चार तुकड्यांना एक शिक्षक सांभाळत आहे. सत्तेत बदल होताच शिक्षकांना अनुशेष गावकरी अनुभवत आहेत.
७०० लोकवस्ती असलेल्या वारपिंडकेपार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार तुकड्या आहेत. या शाळेत ६० विद्यार्थी संख्या आहे. परंतु शिक्षकाअभावी शिक्षणाचा बोजवारा झाला आहे. याच शाळेत प्राथमिक शिक्षण माजी खासदार शिशुपाल पटले, माजी जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी घेतला आहे. या शाळेत साकुरे नामक शिक्षकांवर चार वर्ग सांभाळण्याची पाळी आहे. जि.प. मध्ये शिक्षण सभापती असताना रमेश पारधी यांनी मोरे नामक शिक्षकाला अतिरिक्त प्रभार दिला होता. परंतु सत्तेत बदल होताच अतिरिक्त शिक्षकाला हटविण्यात आले आहे. यामुळे साकुरे नामक शिक्षकांवर शालेय कामांचा व्याप आहे. प्रशासकीय कामे वाढल्याने एकमेव कार्यरत शिक्षकाला डोक्याला ताप आला आहे. यामुळे शिक्षणात एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे.
या संदर्भात पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. परंतु वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्याने शिक्षकांची समस्या सुटता सुटेना झाली आहे. गावकरी कायम स्वरुपी शिक्षक नियुक्त करण्याची ओरड करीत आहेत. शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेण्याचे गावकरी प्रयत्न करीत असले तरीयामुळे शिक्षकांची समस्या सुटणार नाही. (वार्ताहर)