वर्ग चार... विद्यार्थी चार... शिक्षक एक
By Admin | Updated: September 30, 2014 23:31 IST2014-09-30T23:31:21+5:302014-09-30T23:31:21+5:30
इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडल्या आहेत. भंडारा नगरपालिकेच्या बजाज प्राथमिक शाळेची मोठी दैनावस्था निर्माण झाली आहे.

वर्ग चार... विद्यार्थी चार... शिक्षक एक
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा फटका : पालिकेच्या तीन शाळा पडल्या बंद
प्रशांत देसाई - भंडारा
इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडल्या आहेत. भंडारा नगरपालिकेच्या बजाज प्राथमिक शाळेची मोठी दैनावस्था निर्माण झाली आहे. शाळेत चार वर्ग आहे. यात फक्त चार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वर्ग पहिलीला एकही विद्यार्थी नसून चार विद्यार्थ्यांकरिता एक शिक्षक व महिला शिपाई येथे कार्यरत आहे. यापूर्वी पालिकेच्या तीन शाळा बंद पडल्या आहेत, हे विशेष.
भंडारा नगरपालिकेच्या वतीने शहरात चार शाळा सुरू आहेत. १९३४ पासून बजाज प्राथमिक शाळा चालविण्यात येत आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरविण्यात येत आहे. मात्र यावर्षी शाळेवर अवकळा आली आहे. इयत्ता पहिलीला एकही विद्यार्थ्याचा प्रवेश नाही. दुसरीला एक, इयत्ता तिसरीला दोन तर चौथीला एक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे शिक्षण घेणाऱ्या चौघीही मुलीच आहेत. जयश्री गणेश चाचेरे, निकिता ठाणेश्वर सोनवाने, चेतना प्यारेलाल निपाने व रूत दिनेश रामटेके अशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनिंची नावे आहेत. शाळाचा आवार फार मोठा असून तिथे पूर्वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे नऊ वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. सध्या दोन खोल्यांमध्ये शाळेचे काम चालत असल्याने उर्वरीत सात वर्ग खोल्या बंद आहेत.
पालिका प्रशासनाने चार विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेला सुरेश काशिराम मेश्राम यांची शिक्षक म्हणून नेमणुक केली असून तेच मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळीत आहेत. त्यांच्या सोबतीला अनिता शेंदरे या शिपाई म्हणून काम सांभाळत आहेत. शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावत असल्याने येथील बंद वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली असून शाळा परिसरात शेळ्या व इतर पाळीव जनावरे तिथे बस्तान मांडून असतात. पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, कस्तुरबा प्राथमिक शाळा व नरकेसरी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहेत. हिच परिस्थिती बजाज शाळेवर येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी विविध योजना अस्तित्वात आणल्या आहेत. 'स्कूल चले हम' चा नारा देत विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती यासह अनेक योजनांवर लाखोंचा खर्च करण्यात येतो. असे असले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांवर अवकळा आली आहे.
भंडारा नगरपालिकांतर्गत नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा चालविण्यात येत आहे. सध्या प्रत्येक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश देण्यासाठी धडपडत आहे. पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या काँन्व्हेंटमध्ये घालुन त्यांना समाजातील अन्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे शिक्षण देण्यासाठी वर्षाकाठी हजारो रूपयांचे डोनेशन देऊन शिक्षण देत आहे. ही परिस्थिती शहरासह ग्रामीण भागातही रूढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांसह नगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या रोडावत चालली आहे.