नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: November 9, 2014 22:28 IST2014-11-09T22:28:50+5:302014-11-09T22:28:50+5:30
आमगाव येथे कवलेवाडा रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना रस्त्यावरुन आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आमगाव/दिघोरी : आमगाव येथे कवलेवाडा रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना रस्त्यावरुन आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी केली असता ग्रामपंचायत पदाधिकारी कानाडोळा करीत आहे.
दरवर्षी ग्राम प्रशासनातर्फे गावातील नाल्या व कचरा साफ करण्यात येते. मात्र यावर्षी या ठिकाणावरील जमा झालेला कचरा उचलण्यात आला नाही. त्यामुळे कचऱ्याचा ढिग जमा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना या ठिकाणाहून जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पायी जाणे जिवावर येत असते. ही समस्या मागील अनेक वर्षापासून निर्माण झाली असली तरी या समस्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतने कोणत्याच प्रकारचा पुढाकार घेतला नाही.
गावातील नाल्या तुडूंब भरल्या असून जागो जागी पाणी साचत आहे. यावर्षी डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाली होती. पाच ते सहा रुग्णांना सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. मागील आठवड्यामध्ये वंदना मेश्राम या महिलेला तापामुळे नागपूर येथील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गावामध्ये कचरा गाडीचा वापर कधीच करण्यात आला नाही. गंगाधर बडवाईक यांच्या घराजवळील हातपंपापासून ते हरीभाऊ सार्वे यांच्या घरापर्यंत असलेली नाली बारामाही वाहत असते. नाली शेवटच्या टोकावर अरूंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. जागोजागी पाणी साचत राहते. ही नाली अरूंद असलेल्या ठिकाणाहून रूंद करण्याची मागणी सार्वे यांनी ग्रामपंचायतला अनेकदा केली. राष्ट्रीय स्वच्छता मिशन अंतर्गत भंडारा पंचायत समितीमध्ये आमगाव हे गाव समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार ३७० शौचालय बांधकाम करण्याचे मंजूर झाले. हे उद्दिष्ट मार्च १५ पर्यंत पूर्ण करायचे असताना आतापर्यंत जेमतेम २० ते ३० शौचालयाचे काम सुरू असल्याने या मिशनचा बोजवारा वाजला आहे. (वार्ताहर)