शहरातील चौक ठरताहेत नावापुरते
By Admin | Updated: October 25, 2015 00:38 IST2015-10-25T00:38:00+5:302015-10-25T00:38:00+5:30
शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार भंडारावासीयांना नित्याचाच झाला आहे.

शहरातील चौक ठरताहेत नावापुरते
चौकांना अतिक्रमणाचा विळखा :
बॅनर, पोस्टर्सही हटविणे आवश्यक, वाहतूक समस्या ठरतेय नागरिकांना डोकेदुखी
लोकमत जागर
भंडारा : शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार भंडारावासीयांना नित्याचाच झाला आहे. शहरात वाहतुकीचे संचलन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची कुमक कमी असल्याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून चालक वाहन पळवितात. बेफाम वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी होत आहे. शहराची लोकसंख्या सव्वा लाखांहून अधिक आहे. भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातात. यामुळे जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाढते अपघात आणि राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीची समस्या निकाली काढण्यासाठी उड्डाणपुल बांधण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीला अपूरे पडत आहेत. शहरातील मार्गावर धावणारे वाहनांची संख्या वाढली. मात्र रस्त्यांची रूंदी कायमच असल्याने अनेक वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी येथील प्रमुख मार्ग व चौकात वाहतूक पोलीस राहत असूनही चालकांना पुढाकार घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी लागत आहे. भंडारा शहरात येथे १० ते १५ वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे. तसेच पार्किंग झोन तयार केल्यास ही समस्या निकाली निघु शकेल. अतिक्रमण हटविल्यास रस्त्याचे रूंदीकरण करण्यास वाव राहिल. बसस्थानक परिसरात आॅटोसह अन्य खासगी वाहनांच्या रांगा लागत असल्याने वर्दळीकरिता रस्ताच शिल्लक नसतो. कशीबशी वाट काढून चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. चौकांचे विद्रुपीकरण होर्डिंग्जमुळे त्रिमूर्ती चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे. भंडारा शहरात पालिकेच्या यादीनुसार लहान मोठे २५ च्यावर चौक आहेत. यामध्ये महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, अण्णाभाऊ साठे चौक, लायब्ररी चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका चौक, जिल्हा परिषद चौक, असे मुख्य चौक आहेत. त्रिमूर्ती चौकाच्या मधोमध गोलाकार अस्तित्वात आहे. मात्र या चौकात ट्रॅफिक सिग्नल अस्तित्वात नाही. पालिकेच्या यादीत पालिकेच्या यादीत महापुरूषांचे पुतळे असलेल्या १२ चौकांचा समावेश आहे. मात्र एकदोन सोडले तर बहुतेक पुतळ्यावरील धूळही साफ होत नाही. पादचाऱ्यांसाठी आवश्यक झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे प्रत्येक चौकातून गायब आहेत, वाहतुकीचे नियम सांगणारे चिन्हांचे फलक किंवा रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक कुठेही आढळत नाहीत. याउलट जाहिरातींच्या फलकांनी अक्षरश: बाजार मांडलेला आहे. असावे स्मार्ट थांबे चौकाच्या थोड्या अंतरावर संबधित मागार्ने जाणाऱ्यांसाठी आॅटो थांबा असावा. जड वाहने, कार आणि दुचाकींसाठी विशिष्ट जागी उभे राहण्याची नियमावली असावी. जेणेकरून गोंधळ उडणार नाही. शहरातून जड वाहतुकीला पायबंद घालण्यात यावे. जिल्हा परिषद चौकातून राजीव गांधी चौक मार्गे शास्त्री चौकाकडे जड वाहने धावतात. नागपूर नाका मार्गे ही वाहने गेली तर सोयीचे होईल.